परदेशी राहिलेल्या बेळगावच्या सुकन्येची सद्भावना : कोरोनामुळे जर्मनीहून सुटीला घरी येण्याचे टाळले
- गिरीष कल्लेद/ बेळगाव
- दोन महिन्यांची सुटी मिळाली असताना घरी परतण्यास सांगितले… मात्र, प्रवासात एवाद्यावेळी कोरोनाचा संसर्ग झाल्यास माझ्यामुळे देशवासियांना, कुटुंबीयांना आणि शहरापर्यंत कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका आहे. यामुळे मी आहे तिथेच सुरक्षित आहे… असे मुलीने सांगितल्याने मुलीबाबत अभिमान वाटला. बाऊहस युनिव्हर्सिटी वैमर (जर्मनी) येथे शिकत असणाऱया मुलीशी संवाद साधून आई-वडिलांनी सुटीच्यावेळी तिला भारतात परतण्यास सांगितले होते. मात्र, मुलीने घरी येण्याचे टाळले. यामुळे जरी काळजी असली तरी आमचा ऊर भरून आला… जर्मनी येथे एमएस करत असणाऱया नागरत्ना फकिरा मारिहाळ हिच्या आई-वडिलांनी तरुण भारत प्रतिनिधीशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.
- विष्णू गल्ली, वडगाव येथील फकिरा आणि सरोजिनी मारीहाळ यांची नागरत्ना कन्या आहे. मूळचे मोदगा येथील असणारे मारीहाळ कुटुंबीय सध्या वडगाव येथे स्थायिक आहे. नागरत्नाने डी.पी. शाळेतून प्राथमिक-माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जीएसएस महाविद्यालयातून पुढील शिक्षण पूर्ण केले. जीआयटी इंजिनिअरिंगमधून सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर एम.एस.साठी जर्मनी येथील वर्लिंग युनिव्हर्सिटी येथे प्रवेश घेतला आहे. गेल्या दीड वर्षापासून ती जर्मनी येथेच शिक्षण घेत आहे.
- सध्या जर्मनीतही मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला आहे. यामुळे मुलीची काळजी लागून राहिली आहे. त्यातच नागरत्नास काही दिवसांपूर्वी ताप, सर्दी झाल्याने आमच्या काळजीत आणखीनच भर पडली होती. यामुळे दोन महिन्यांची सुटी असताना घरी परत ये, असे सांगितले. मात्र जर्मनीहून भारतात येताना प्रवासादरम्यान एवाद्यावेळेस मलाही संसर्ग झाल्यास माझ्यामुळे देशात, बेळगावात आणि कुटुंबीयांपर्यंत कोरोना पसरण्याची शक्मयता आहे. यामुळे मी जर्मनी येथेच योग्य खबरदारी घेऊन राहणार असल्याचे धीटपणाने तिने सांगताच आम्हालाही मुलीबद्दल अभिमान वाटला. मात्र तरीही जर्मनी येथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालल्याने मुलीबद्दल काळजी वाटत आहे, असे फकिरा आणि सरोजिनी मारीहाळ यांनी सांगितले.
- नागरत्नाशी वारंवार व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्यात येतो. तेथील परिस्थितीची माहिती घेऊन खबरदारी आणि काळजी घेण्यास सांगतो. उलट तीच आम्हाला काळजी घेण्याबाबत सांगत असते. जर्मनी येथे लॉकडाऊनमुळे पूर्णपणे बंद अशी परिस्थिती आहे. ती राहत असणाऱया वैमर सिटीत अनेक भारतीय तसेच कर्नाटकातील मुलीही शिक्षणासाठी आहेत. या ठिकाणी मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल असून याच हॉस्टेलमध्ये सुरक्षित अंतर राखून राहत असल्याचे तिने सांगितले. जर्मनी येथे वैद्यकीय सुविधा चांगली आहे. मात्र जीवनावश्यक वस्तू मिळणे दुरापास्त बनत चालल्याने जेवणासाठी काहीवेळा तडजोड करावी लागत आहे. जे मिळते त्यातच समाधान मानण्याची वेळ सध्या जर्मनीत असल्याचे व्हिडिओ कॉलद्वारे आई-वडिलांशी बोलताना नागरत्नाने सांगितले.
नागरत्नाने जीआयटीमधून इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर 2015-16 मध्ये बेंगळूर येथील जर्मन कंपनीत दोन वर्षे सेवा बजावली. त्यानंतर 2018 पासून ती जर्मनी येथील बाऊहस युनिव्हर्सिटी येथे शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी तिला सर्दी व ताप आल्याचे समजताच आम्हाला रात्रभर झोप लागली नाही. मात्र, दाढदुखीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे निदान झाल्याचे समजले. यामुळे दिलासा मिळाला. तरी आई म्हणून मुलीची काळजी आहेच, असे सांगताना सरोजिनी मारीहाळ यांचे डोळे पाणावले