जुलैपासून अंमलबजावणी : जास्त वीज वापरल्यास संपूर्ण बिल भरावे लागणार
चंदिगढ / वृत्तसंस्था
पंजाबमधील प्रत्येक घराला दरमहा 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. त्यात कोणतीही श्रेणी राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गरिबांपासून श्रीमंत कुटुंबांपर्यंत दोन महिन्यांत 600 युनिट मोफत वीज उपलब्ध होणार आहे. तथापि, जे कुटुंब दोन महिन्यांत 600 युनिटपेक्षा जास्त वीज खर्च करेल, त्यांना संपूर्ण बिल भरावे लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पंजाबवर सुमारे 3 लाख कोटींचे कर्ज आहे. आता 300 युनिट मोफत वीज दिल्याने सरकारी तिजोरीवर दरवषी सुमारे 5 हजार कोटींचा बोजा वाढणार आहे.
पंजाब आधीच कृषी क्षेत्राला मोफत वीज पुरवत आहे. तसेच अनुसूचित जाती, मागासवर्गीय प्रवर्ग आणि दारिद्रय़रेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबांना आधीपासून 200 युनिटपर्यंत सूट देण्यात आलेली आहे. त्यांना आता दरमहा 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. त्यासाठी तो जी वीज खर्च करेल तेवढेच बिल द्यावे लागेल. त्यांना संपूर्ण बिल भरावे लागणार नाही.
सरकार व्यावसायिक आणि औद्योगिक वीजदरात वाढ करणार नाही. शेतकऱयांना मोफत वीजही मिळत राहील. याशिवाय, सरकारने 31 डिसेंबर 2021 पर्यंत 2 किलोवॅटपर्यंतच्या सर्व घरांची संपूर्ण देणी माफ केली आहेत. वीज महामंडळात भरती झालेल्या 718 कर्मचाऱयांना नियुक्तीपत्र दिल्यानंतर मान यांनी ही घोषणा केली.
मोफत वीजेवरून राजकीय ठिणगी
काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये मोफत विजेच्या मुद्यावरून राजकीय वाद झाला होता. पंजाबच्या मुख्य सचिवांसह वीज महामंडळाच्या बडय़ा अधिकाऱयांनी दिल्लीत जाऊन अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर विरोधी पक्षांनी केजरीवाल सुपर सीएम म्हणून काम करत असल्याचा आरोप केला. मात्र, आपण अधिकाऱयांना प्रशिक्षणासाठी पाठवले होते. गरज भासल्यास इतर राज्यांतही पाठवू, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री मान यांनी दिले होते.
सरकार कर्ज वसूल करेल
पंजाबवर सध्या 3 लाख कोटींचे कर्ज आहे. ते कुठे गेले? याचा शोध घेतला जात आहे. राज्यात शाळा, रुग्णालय, महाविद्यालय किंवा विद्यापीठ बांधले गेले नाही. असे असतानाही कर्ज कुठे गेले हे मला सर्व माहीत आहे, सरकार सर्वांची वसुली करेल, असा इशारा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिला आहे.