ऑनलाईन टीम / मुंबई :
18 ते 45 वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आजच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. असे असले तरी 18 ते 45 वयोगटातील लसीकरण लांबणीवर पडले आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
ते म्हणाले, राज्याला मोठ्या प्रमाणावर लसीची कमतरता आहे. त्यामुळे 1 मे पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, आगामी 6 महिन्यात 18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची समिती सूक्ष्म नियोजन करत आहे. लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुषंगाने प्रत्येकाला लस मिळेल. यामध्ये 18 ते 25, 25 ते 35 आणि 35 ते 45 अशी वर्गवारी करण्याचे काम सुरू आहे. 35 ते 45 हा गट आधी घेता येईल का? याची चाचपणी सुरू आहे. यातले सहव्याधीचे रुग्ण आधी घेता येतील का? यावर देखील विचार सुरू आहे. तसेच येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे, असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.
- नावनोंदणी आवश्यक
पुढे ते म्हणाले, सरकारी दवाखान्यात लस मोफत दिली जाणार आहे. मात्र यासाठी नावनोंदणी आवश्यक असून कोविन ॲप किंवा आरोग्य सेतू ॲप वापरणे आवश्यक आहे. कुणीही थेट केंद्रावर जाऊन लसीची मागणी करू नये. केंद्र सरकारने नोंदणी बंधनकारक केली आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.