3 नोटांच्या मदतीने मिळणार किलोभर तांदूळ
वृत्तसंस्था/ काराकस
कच्च्या तेलाच्या मदतीने समृद्धी अनुभवलेला दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलामध्ये आता लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या देशाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. तेथील महागाईमुळे लोक बॅग आणि पोत्यांमध्ये भरून नोटा घेऊन जातात आणि हातातील लहान पिशवीमध्ये भरून घरासाठीचे साहित्य खरेदी करून आणतात. चलनाच्या प्रचंड अवमूल्यनामुळे व्हेनेझुएला आता 1 लाखाची नोट चलनात आणण्याची योजना आखत आहे.
व्हेनेझुएलाचे सरकार आता 1 लाख बोलिवर (तेथील चलन) नोट छापणार आहे. याकरता इटलीच्या एका कंपनीकडून 71 टन सिक्युरिटी पेपरची आयात करण्यात आली आहे. व्हेनेझुएलात 1 लाख बोलिवरची नोट छापण्यात आल्यास ती सर्वात मोठे मूल्य असलेली नोट ठरणार आहे. परंतु तरीही याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य 0.23 युएस डॉलर्स असेल. इतक्या रकमेत तेथे केवळ 2 किलो बटाटे किंवा अर्धा किलो तांदूळच खरेदी करू शकणार आहेत.
7 वर्षांपासून मंदी
कोरोना महामारी आणि कच्च्या तेलातून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था सलग 7 व्या वर्षी मंदीत आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत देशाची अर्थव्यवस्था 20 टक्क्यांनी आंकुचन पावणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. भ्रष्टाचारामुळे या देशाची अर्थव्यवस्था अधिकच रसातळाला जात आहे.
अर्थव्यवस्था होतेय कमजोर
व्हेनेझुएलाला सोने विकून सामग्री खरेदी करावी लागत आहे. व्हेनेझुएलात लाखो लोक उपाशीपोटी राहत आहेत. एका अहवालानुसार देशत सुमारे 7 लाख लोकांकडे दोनवेळचे अन्न मिळविण्याइतकेही पैसे नाहीत. संयुक्त राष्ट्रसंघानुसार देशातील प्रत्येक 3 पैकी एका नागरिकाकडे पुरेसे अन्न नाही. सद्यकाळात कोरोनामुळे स्थिती अधिकच बिघडली आहे.
देश सोडण्यावर भर
2013 पासून सुमारे 30 लाख लोकांनी देशातून बाहेर पडत शेजारच्या ब्राझील, इक्वेडोर आणि पेरूमध्ये आश्रय घेतला आहे. स्थिती बिघडत चालल्याने या देशांनी व्हेनेझुएलाच्या सीमेवर स्वतःचे सैन्य तैनात केले आहे. सद्यकाळात हे जगातील कुठल्याही देशात झालेले सर्वात मोठे विस्थापन आहे.