ईडीची कारवाई – मायावती सरकारच्या काळातील घोटाळा
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तरप्रदेशात मायावती सरकारच्या कार्यकाळात झालेल्या साखर कारखान्यांच्या विक्रीतील घोटाळय़ाप्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. बसपचे माजी आमदार हाजी इक्बाल यांची 1 हजार कोटींपेक्षा अधिक मूल्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. बसप सरकारच्या कार्यकाळात 11 साखर कारखाने नाममात्र दरात विकण्यात आले होते. याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीनंतर सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. बसप आमदारानेच अनेक साखर कारखाने खरेदी केले होते.
आमदार इक्बाल यांच्या 7 साखर कारखान्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील काही साखर कारखाने त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर नोंदणीकृत होते. त्यांचे एकूण मूल्य 1,097 कोटी रुपये असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे. ईडीकडून अन्य ठिकाणी असलेल्या मालमत्तांसंबंधी तपास केला जात आहे. 2020 साली सीबीआयच्या छाप्यांदरम्यान इक्बाल यांच्या घरातून कोटय़वधींच्या मालमत्तेचे दस्तऐवज हस्तगत झाले होते.