तिरुपती / वृत्तसंस्था
चेन्नईतील एका मुस्लीम कुटुंबाने आंध्रप्रदेशातील तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वराच्या तिरुपती मंदिराला 1.02 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. व्यापारी अब्दुल गनी आणि त्यांची पत्नी सुबिना बानो यांनी तिरुमला तिरुपती देवस्थान अधिकाऱयांना नुकताच धनादेश सुपूर्द केला. या देणगीपैकी 87 लाख रुपये पद्मावती विश्रामगृहात नव्याने बांधलेल्या फर्निचर आणि भांडय़ांसाठी खर्च केला जाणार आहे. तसेच या निधीच्या माध्यमातून तेथील अन्य सुविधांमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत. तसेच दररोज मंदिराला भेट देणाऱया हजारो भाविकांना मोफत भोजन पुरवणाऱया एसव्ही प्रसादम ट्रस्टसाठी 15 लाख रुपये देण्यात येणार आहेत. अब्दुल गनी यांनी यापूर्वीही बालाजीचरणी देणगी दिली आहे.
अब्दुल गनी या मुस्लीम कुटुंबाने नुकतीच तिरुमला तिरुपती देवस्थानच्या अधिकारी ए. व्ही. धर्मा रेड्डी यांची भेट घेतली. त्यानंतर धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. अब्दुल गनी यांनी मंदिराला देणगी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2020 मध्ये त्यांनी कोरोना महामारीच्या काळात मंदिर परिसरात जंतुनाशक फवारण्यासाठी ट्रक्टर-माउंट स्प्रेअर दान केले. यापूर्वी सुबीना बानो आणि अब्दुल गनी यांनी भाजीपाला वाहतूक करण्यासाठी 35 लाख रुपयांचा रेफ्रिजरेटर ट्रक मंदिराला दान केला होता.
दक्षिण भारतातील सर्व मंदिरे त्यांच्या भव्यतेसाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु तिरुपती बालाजीचे मंदिर सर्वात लोकप्रिय आहे. तिरुपती बालाजी मंदिर आंध्रप्रदेशातील चित्तूर जिह्यात आहे. हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. येथे दररोज कोटय़वधी रुपयांच्या देणग्या येतात.