Tarun Bharat

सप्टेंबरमध्ये 1.47 लाख कोटी जीएसटी जमा

Advertisements

मागील वषीच्या तुलनेत 26 टक्के अधिक ः कर संकलनात महाराष्ट्र अव्वल

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

गेल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये 1.47 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. हे करसंकलन ऑगस्टच्या तुलनेत अधिक आहे. ऑगस्टमध्ये 1.44 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर जमा झाला होता. तसेच मागील वर्षाच्या म्हणजे सप्टेंबर-2021 च्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबरमधील जीएसटी संकलनात 26 टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये जीएसटी संकलन 1.17 लाख कोटी रुपये होते. आतापर्यंतचे सर्वात मोठे जीएसटी संकलन एप्रिल महिन्यात झाले आहे. एप्रिलमध्ये 1.67 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते.

सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख 47 हजार 686 कोटी रुपये झाले. या आकडेवारीवरून सलग सातव्या महिन्यात जीएसटी संकलन 1.4 लाख कोटींहून अधिक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सप्टेंबरमध्ये एकूण जीएसटी संकलनात केंद्रीय जीएसटी 25,271 कोटी रुपये, राज्य जीएसटी 31,813 कोटी आणि एकात्मिक जीएसटी संकलन 80,464 कोटी रुपये इतके आहे. एकात्मिक जीएसटी संकलनामध्ये, वस्तूंच्या आयातीवर 41,215 कोटी आणि 10,137 कोटींचे उपकर संकलन झाले आहे. यामध्ये आयात मालावर 856 कोटींचा उपकर लावण्यात आला. याशिवाय सप्टेंबर महिन्यात 1.1 कोटीहून अधिक महामार्ग आणि ई-वे बिले काढण्यात आली. त्यापैकी 72.94 लाख ई-इनव्हॉइस आणि 37.74 लाख ई-वे बिले आहेत.

चालू आर्थिक वर्षातील संकलन

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात एप्रिलमध्ये एकूण 1,67,540 कोटी जीएसटी संकलन झाले, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. त्यानंतर हा आकडा मे महिन्यात 1,40,885 कोटी, जूनमध्ये 1,44,616 कोटी, जुलैमध्ये 1,48,995 कोटी इतका होता. ऑगस्ट महिन्यात 1,43,612 कोटी आणि जुलै महिन्यात 1,48,995 कोटींचे जीएसटी संकलन करण्यात आले.

एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाचा विक्रम

एप्रिल 2022 मध्ये पहिल्यांदाच जीएसटी संकलन 1.5 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. एप्रिलमध्ये एकूण जीएसटी महसूल 1,67,540 कोटी रुपये नोंदवला गेला. यामध्ये सीजीएसटी 33,159 कोटी रुपये, एसजीएसटी 41,793 कोटी रुपये, आयजीएसटी 81,939 कोटी रुपये आणि सेस 10,649 कोटी रुपये होता.

महाराष्ट्र आघाडीवर, कर्नाटक दुसऱया स्थानी

जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या 5 राज्यांमध्ये आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील जीएसटी संकलन मागील वर्षाच्या तुलनेत 29 टक्के वाढून 21,403 कोटी रुपये झाले आहे. या यादीत 9,760 कोटींच्या कलेक्शनसह कर्नाटक दुसऱया तर गुजरात 9,020 कोटींच्या कलेक्शनसह तिसऱया क्रमांकावर आहे.

Related Stories

केजरीवालांच्या निवासावर बग्गा समर्थकांची धडक

Patil_p

देशात बाधितांचा आकडा 3 कोटींवर

Patil_p

राज्यात नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू

Patil_p

सर्वोच्च न्यायालयात 2 न्यायाधीशांची नियुक्ती

Patil_p

कोरोनाचा कहर! दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 594 डॉक्टरांचा मृत्यू

Tousif Mujawar

पंजाबमध्ये साकारला विश्वविक्रम

Patil_p
error: Content is protected !!