पुणे / प्रतिनिधी :
बिटकॉइन आणि ब्लू पिक क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक केल्यास अल्पावधीत चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून 8 जणांची तब्बल 1 कोटी 47 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे .
इमरान खान (वय 35, रा. खराडी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत डॉ. पराग श्रीरंग दिनकर (रा. मुलुंड, मुंबई) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार मे 2022 पासून आतापर्यंत घडलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इमरान खान याने त्याच्या बिटकॉइन व ब्लू पिक कंपनी विमाननगर पुणे या कंपन्यांमध्ये ॲपच्या माध्यमातून बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवल्यास 12 महिन्यांमध्ये दुप्पट रक्कम व ब्लू पिकमध्ये पैसे गुंतवल्यास प्रत्येक महिन्याला 15 टक्के रक्कम 15 महिने मिळेल असा विश्वास तक्रारदार यांचा संपादित केला. त्यानंतर या स्कीममध्ये तक्रारदार व इतर गुंतवणूकदार यांना त्यांच्या कंपनीच्या स्कीममध्ये पैसे भरण्यास भाग पाडून, ते पैसे परत न करता तक्रारदार यांची 25 लाख रुपयांची तर त्यांच्यासह इतर आठ जणांची मिळून एकूण 1 कोटी 47 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी इम्रान खान याच्यावर भारतीय दंड विधानसहिता कलम 406, 420, 566 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.