बनावट पासबुक तयार करून 2 वर्षांपासून फसवणूक
वृत्तसंस्था/ इंदोर
मध्यप्रदेशातील एका पोस्टमास्तरच्या कृत्यामुळे ग्राहकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतोय. पोस्टमास्तर विशाल अहिरवारने आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावण्याकरता 24 कुटुंबांची बचत संपविली आहे. ही रक्कम विशालला सागर जिल्हय़ातील एका सब पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायची होती. विशाल हा बीना सब पोस्ट ऑफिसरमध्sय पोस्टमास्तर पदावर कार्यरत आहे.
विशालला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने ग्राहकांच्या बचतीची रक्कम सट्टा लावण्याकरता वापरल्याची बाब कबूल केली आहे. आरोपी पोस्टमास्तरने ग्राहकांकडून लाखो रुपये स्वीकारून त्यांना बनावट पासबुक, एफडीची पावती दिली होती. ग्राहक स्वतःच्या खात्यांमधून रक्कम काढण्यास पोहोचल्यावर याप्रकरणी खुलासा झाला आहे. विशालने मागील 2 वर्षांपासून ग्राहकांच्या 1 कोटी रुपयांचा वापर सट्टा लावण्यासाठी केला आहे. त्याच्या विरोधात भादंविचे कलम 420 आणि 408 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.