शहरात बँकांवर महिलांचा लुटमारीच्या घटना ताज्या असताना एसटी प्रवासात एका महिलेची तब्बल 1 लाख 62 हजार 500 रूपयांचा मुद्देमालासह हॅन्ड बॅग चोरीला गेली. बॅगेतील सुमारे चार तोळे, सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण रोख 5 हजार रुपये असा मुद्देमाल चोरटय़ाने लंपास केला. सातारा जिह्यातील घोटील ते कोरोची या एसटी बसच्या प्रवासादरम्यान ही घटना घडली. याबाबतची फिर्याद रेश्मा सचिन पवार (वय 30) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी फिर्यादी रेश्मा पवार या सातारा जिह्यातील पाटण तालुक्यातील घोटील ते कोरोची असा मंगळवारी (ता.6) एसटी प्रवास करत होत्या. एसटी कोरोची येथील पाण्याच्या टाकीजवळ आली. एसटीतून उतरणार तोपर्यंत त्यांची छोटी हँड बॅग निदर्शनास आली नाही. एसटीमध्ये इकडे तिकडे शोधाशोध सुरू केली.मात्र हॅन्ड बॅग मिळून आली नाही. बॅगेत दोन सोन्याच्या अंगठय़ा, सोन्याचा नेकलेस, मंगळसूत्र, सोन्याची साखळी असे चार तोळे सोने तसेच चांदीचे पैंजण आणि रोख रक्कम असा मुद्देमाल होता. एकुण 1 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली असून अज्ञात चोरटय़ावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

