ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यभरातून संताप व्यक्त आहे. पुण्यात राष्ट्रवादीकडून कोश्यारी यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यपालांचे धोतर फाडणाऱ्यास आणि फेडणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप शशिकांत काळे यांनी शहरात ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. त्यामध्ये “आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते, आहेत आणि कायम राहणारच… उतरत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध आहे. त्यांचे धोतर फाडणाऱ्यास आणि फेडणाऱ्यास 1 लाख रुपयांची रोख रक्कम दिली जाईल, ”असा मजकूर या बॅनरवर आहे.
अधिक वाचा : फडणवीसांवर आक्षेपार्ह पोस्ट भोवली; तरुणावर गुन्हा
शनिवारी औरंगाबाद येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी बोलताना कोश्यारी म्हणाले होते की, गडकरी आणि पवार दोन्ही नेते द्रष्टे आहेत. पीएचडी आणि डि. लीट पदवी पेक्षा त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. मला असं वाटतं, जर कोणी विचारलं तुमचे आदर्श कोण आहेत, तर बाहेर जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला मिळतील. शिवाजी महाराज तर जुने झाले, मी नवीनांबद्दल बोलतोय. आंबेडकरांपासून ते गडकरीपर्यंत इथेच मिळतील, असं वादग्रस्त वक्तव्य करत गडकरी आणि पवारांची तुलना त्यांनी महापुरुषांशी केली होती.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी कोश्यारींच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोश्यारी सातत्याने अशी बडबड का करतात, असा प्रश्न मला पडला आहे. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती आहे की, अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको आहे. त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.