समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे ध्येय
नवी दिल्ली
दोन वर्षांच्या व्यापारातील संथगतीनंतर आता समुद्री खाद्य उत्पादनाच्या निर्यातीला वेग येत आहे. समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (एमपीईडीए) वर्ष 2025 पर्यंत एक लाख कोटी रुपयांचा व्यवसाय साध्य करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे.
एमपीईडीएचे अध्यक्ष एन राघवन यांनी म्हटले आहे, की सदरचे उत्पादन वाढीचे ध्येय प्राप्त करण्यासाठी प्राधिकरण विविध प्रकारच्या प्रयत्नांना वाव देत आहे. विविध समुद्री उत्पादनांचे सादरीकरण करुन त्यामध्ये वाढ करण्यावर भर देणार असल्याची माहिती आहे.
‘आमच्यासाठी तो कठीण काळ’
वर्ष 2018 ते 19 हा आमच्यासाठी खूप कठीण काळ राहिला आहे. कारण यामध्ये कोरोना महामारीमुळे लॉजिस्टिक व त्याच्याशी संबंधीत असणाऱया घटकांमध्ये अनेक अडचणी जाणवल्या होत्या. मात्र आता हे क्षेत्र काहीसे सावरत मागील आर्थिक वर्षापासून निर्यात वाढली असल्याचे राघवन यांनी स्पष्ट केले आहे.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये समुद्री खाद्य उत्पादकांची निर्यात वधारुन 774 कोटी डॉलर इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. तसेच निर्यातीसह मालाची उलाढाल होणाऱया भाडय़ातही वाढ झाली आहे. ही बाब महत्वपूर्ण असल्याचेही यावेळी प्राधिकरणाने नमूद केले आहे.