केवळ 1 टक्के लोकांकडे असते हे वैशिष्टय़
जेव्हा आम्ही एखाद्या पानाकडे पाहतो, तेव्हा केवळ हिरवा रंग दिसून येतो. परंतु ऑस्ट्रेलियातील कॉन्सेटा एंटिकोला या पानात अनेक रंग दिसून येतात. एंटिको ही टेट्राकोमेट आहे, म्हणजेच तिच्या डोळय़ांच्या रेटिनामध्ये चौथा कलर रिसेप्टर आहे. सर्वसाधारणपणे लोकांच्या डोळय़ांमध्ये तीनच कलर रिसेप्टर असतात. त्यांना कोन सेल्स म्हटले जाते. यात 10 लाख रंगांना वेगवेगळे करण्याची क्षमता असते.
वैज्ञानिकांनुसार टेट्रोक्रोमेटचे डोळे 10 कोटी रंग ओळखण्यास आणि वेगळे करण्यास सक्षम असतात. मला लहानपणापासूनच मी जादुई जगात राहत असल्याचे वाटत होते. माझ्यासाठी सर्वकाही अधिकच अद्भूत होते. मला प्रत्येक गोष्टीत विस्तृत दिसून यायचे. मी जे काही पहायचे ते चित्रात उतरवत होते असे एंटिको सांगते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर ती अमेरिकेच्या सॅन दियागोमध्ये कला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
2012 पर्यंत तिला या वैशिष्टय़ाबद्दल माहित नव्हते. तिच्या एका न्यूरोलॉजिस्ट विद्यार्थ्याने टेट्राक्रोमेसीवरून अध्ययन मांडले, यात अशा महिलेची मुलगी रंगांधळे होण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. या अध्ययनाच्या काही काळापूर्वीच एंटिको यांच्या मुलीला रंगांधळेपणाची समस्या असल्याचे समजले होते.
15 टक्के महिलांमध्ये टेट्रोक्रोमेसीसाठी जबाबदार जीन आढळून येत. हे केवळ महिलांनाच होऊ शकते. जगात केवळ 1 टक्के लोकांसोबत असे घडल्याचे कॅलिफोर्निया विद्यापीठातील तज्ञ किंबर्ले जेम्सन यांनी म्हटले आहे.
ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू करणार
एंटिको रंगांधळेपणाने ग्रस्त लोकांच्या मदतीसाठी नवे मार्ग शोधत आहे. समस्या लवकर ओळखल्यास संबंधितांच्या मेंदूला लवकर प्रशिक्षित केले जाऊ शकते असे तिला वाटते. ती लवकरच एक कलर ब्लाइंड आर्ट स्कूल सुरू करणार आहे. तसेच टेट्रोक्रोमेट्ससाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मही सुरू करणार आहे.