ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात चंदनापुरी घाटात आज पहाटे एका टेम्पोला भीषण आग लागली. या आगीत टेम्पोतून नेण्यात येणाऱ्या 10 वी-12 वी पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात हॉटेल साईप्रसादसमोर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर टेम्पोने (क्रमांक एम. पी. 36 एच. 0795) अचानक पेट घेतला. आग लागल्याचे समजताच चालकाने टेम्पो रस्त्याच्या एका बाजूला थांबवला. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील तसेच संगमनेर साखर कारखान्याचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीत तोपर्यंत पुणे बोर्डाच्या 10 वी-12 वी च्या संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. हा टेम्पो भोपाळमधून 10 वी-12 वी च्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन पुण्याकडे येत होता. या दुर्घटनेनंतर नाशिक-पुणे वाहतूक काही काळासाठी जुन्या घाटातून वळवण्यात आली होती.
या वाहनाला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समोर आले नाही. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.