बसपासच्या माध्यमातून आतापर्यंत 5 लाखाचा महसूल जमा : 31 जानेवारीपर्यंत नुतनीकरणची मुदत
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने बसपासचीदेखील प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, ऑनलाईन बसपास प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा थंडा प्रतिसाद असलेला पाहायला मिळत आहे. महिन्याभराच्या कलावधीत केवळ 10857 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन बसपास प्रक्रिया पूर्ण करून बसपास मिळविले आहेत. बसपासच्या माध्यमातून परिवहनला आतापर्यंत केवळ 5 लाखांचा महसूल जमा झाला आहे. जुन्या बसपासची मुदत 31 जानेवारी रोजी संपणार असून तत्पूर्वी विद्यार्थ्यांना नवीन बसपास काढून घ्यावा लागणार आहे.
दरवषी शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली की परिवहन मंडळाकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. यंदा कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बराच काळ बंद होती. त्यामुळे बसपासच्या कामालादेखील स्थगिती मिळाली. मात्र, आता शासनाने शाळा-महाविद्यालये सुरू केल्याने विद्यार्थ्यांना बसपास बंधनकारक बनला आहे.
यंदा बसपास प्रक्रिया किचकट असल्याने विद्यार्थ्यांनी बसपास मिळण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. जुन्या बसपासची मुदत जानेवारीअखेर संपणार असल्याने विद्यार्थ्यांना बसपास काढणे अनिवार्य आहे. बसपासच्या आधारे प्रवास करणाऱया विद्यार्थ्यांची संख्यादेखील अधिक आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे प्रक्रियेचे स्वरुप बदलण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या बसपासची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली असून जुना बसपास व शुल्क पावती दाखवून विद्यार्थ्यांचा बसप्रवास सुरू आहे.
बसपासची प्रक्रिया बदलली असून ऑनलाईनद्वारे बसपास प्रक्रिया सुरू आहे. याकरिता विद्यार्थ्यांना बसपास मिळवायचा असल्यास सेवा सिंधू स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागत आहे. त्यानंतर अर्ज केलेली पावती बसपास विभागात जमा करावी लागणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची छाननी करून बसपास उपलब्ध होणार आहे. बसपास विभागात गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून बसपास प्रक्रिया सुरू आहे. मात्र विद्यार्थ्यांचा बसपाससाठी प्रतिसाद थंडाच असलेला पाहायला मिळत आहे.