पाटणा / वृत्तसंस्था
बिहारमधील पाटणा येथे गंगा नदीत सोमवारी बोट दुर्घटना घडली. शाहपूर येथील शेरपूर घाटात बोट पलटी होण्याची घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अपघातसमयी सदर बोटीत 55 जण होते. या प्रवाशांपैकी काही जणांचे प्राण वाचविण्यात यश आले असले तरी 10 जण बेपत्ता आहेत. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना सामावून घेतल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. शाहपूर पोलिसांनी गंगा नदीत शोध आणि बचावकार्य सुरू केले आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ आणि स्थानिकांनी संयुक्तपणे काम केले. तथापि, सायंकाळपर्यंत काही जणांचा थांगपत्ता लागू शकला नाही. काळोखमय वातावरणामुळे शोधमोहीम तात्पुरती थांबवण्यात आली असून मंगळवारी सकाळी पुन्हा बेपत्तांचा शोध घेतला जाणार आहे.