मागच्या वर्षी 15 हजारपेक्षा जास्त कार्सची विक्री
वृत्तसंस्था / मुंबई
जर्मनीतील लक्झरी कार निर्माती कंपनी मर्सीडिझ बेंझ यावर्षी 10 नव्या कार्स बाजारात उतरवणार असल्याची माहिती आहे. याअंतर्गत कंपनीने नुकतीच म्हणजे मागच्या आठवडय़ात आपली नवी एएमजी इ कॅब्रियोलेट कार लाँच केली आहे.
मर्सीडिझ बेंझ यंदा आपल्या 10 नव्या कार्स भारतीय रस्त्यावर उतरवणार असल्याचे समजते. यातील अधिकतर कार्सच्या किंमती या 1 कोटी रुपयांवरील असतील, असेही कंपनीने म्हटले आहे. दुसरीकडे कंपनीने वर्ष 2022 मध्ये 15 हजार 822 कार्सची विक्रमी विक्री केली आहे. ज्यात 3 हजार 500 कार्स या 1 कोटी रुपयांच्या आहेत. त्याच्या मागच्या म्हणजेच 2021 साली कंपनीने 11 हजार 242 कार्सची विक्री केली होती.
याआधी 2018 मध्ये कंपनीने 15 हजार 583 कार्सची विक्री करण्यात यश मिळवलं होतं. शुक्रवारी कंपनीची पहिली गाडी एएमजी इ कॅब्रियोलेट लाँच करण्यात आली जिची किंमत 1.3 कोटी रुपये असणार आहे. मागच्या वर्षी महागडय़ा कार्सच्या मागणीचा वाटा लक्षणीय 69 टक्के इतका राहिला आहे. यंदा दाखल होणाऱया 10 कार्समध्येही लक्झरी कार्सची (1 कोटीपेक्षा अधिक किमतीच्या) संख्या अधिक असणार आहे, असे समजते.
कारभार नव्या सीईओंकडे
याचदरम्यान कंपनीच्या सीईओ व व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी अलीकडेच संतोष अय्यर यांनी स्वीकारली आहे. ते आधीपासून कंपनीत कार्यरत होते, त्यांना अलीकडेच बढती मिळाली आहे.