केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा ः वयोमर्यादेतही दिली सूट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने शुक्रवारी अग्निवीरांसंबंधी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. बीएसएफमध्ये माजी-अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षणाची घोषणा सरकारने केली आहे. याचबरोबर सरकारने कमाल वयोमर्यादेप्रकरणी सूट देण्याची घोषणा करयणत आली आहे. वयोमर्यादेतील सूट ही अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा हिस्सा आहे का नंतरच्या तुकडीच्या यावरच निर्भर असणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंबंधी अधिसूचनेच्या माध्यमातून यासंबंधी घोषणा केली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दल अधिनियम, 1968 चे कलम 141 चे उपकलम (2)च्या खंड (ब) आणि (क) द्वारे प्राप्त अधिकारांचा वापर करत ही अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने अधिकारांचा वापर करत सीमा सुरक्षा दल, जनरल डय़ुटी कॅडर (अराजपत्रित) भरती नियम, 2015 मध्ये दुरुस्ती कली आहे. सीमा सुरक्षा दल, जनरल डय़ुटी कॅडर (अराजपत्रित) नियम, 2023 हा 9 मार्चपासून प्रभावी झाला आहे.
कॉन्स्टेबल पदाकरता वयोमर्यादेत सूट
कॉन्स्टेबल पदाशी संबंधित भागाच्या नियमांमध्ये बदल केला जाईल आणि कमाल वयोमर्यादेशी निगडित सूटची तरतूद सामील केली जाईल. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतील उमेदवारांसाठी 5 वर्षांपर्यंत तर माजी-अग्निवीरांच्या अन्य सर्व तुकडींप्रकरणी 3 वर्षांपर्यंतची सूट दिली जाणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या अग्निवीरांना पुन्हा शारीरिक चाचणीत भाग घ्यावे लागणार नाही. हे अग्निवीर थेट पुढील फेरीतील भरती प्रक्रियेसाठी पात्र असतील.
अग्निपथ योजना
केंद्रीय मंत्रिमंडळाने 14 जून 2022 रोजी तरुण-तरुणींसाठी सशस्त्र दलांमधील भरती योजनेचे नवे स्वरुप लागू केले हेते. या योजनेला अग्निपथ हे नाव देण्यात आले आहे. याच्या उमेदवारांना 4 वर्षांच्या कालावधीसाठी अग्निवीर म्हणून निवडले जाणार आहे. तसेच त्यांना 10 आठवडय़ांपासून 6 महिन्यांपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. अग्निवीरांना वर्षात 30 दिवसांची सुटी आणि वैद्यकीय रजा स्वतंत्रपणे (वैद्यकीय तपासणीवर निर्भर) मिळणार आहे. अग्निवीर भारतीय सैन्यात एक वेगळा रँक असणार आहे. 4 वर्षांच्या कालावधीनंतर 25 टक्के अग्निवीरांना सैन्यात कायम ठेवले जाणार आहे. तर उर्वरित अग्निवीरांना देशातील निमलष्करी दल, पोलीस तसेच खासगी क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.