शाहरुख-दीपिका पदूकोनचा चित्रपट : बेशरम रंग गाण्यात करावा लागला बदल
वृत्तसंस्था / मुंबई
शाहरुख खान आणि दीपिका पदूकोनचा चित्रपट ‘पठान’ला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने ‘बेरशम रंग’ गाण्यात काही बदल सुचविले आहेत. यात गाण्याचे बोल आणि काही दृश्यांचा समावेश आहे. बोर्डाने यात बदल करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरीही दीपिका पदूकोनची वादग्रस्त कथित भगव्या रंगाची बिकिनी गाण्यात दिसण्याची शक्यता आहे. चित्रपटातील एकूण 10 दृश्ये बदलण्याच्या सूचना सेन्सॉरने केल्या आहेत. आता चित्रपटाची एकूण लांबी 146 मिनिटांची म्हणजेच 2 तास 26 मिनिटांची झाली आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
सेन्सॉरच्या सूचनेनुसार काही बदल करण्यात आले आहेत, पण गाण्यातील भगव्या रंगाची बिकिनी मात्र तशीच दिसू शकते असे म्हटले जात आहे. ‘बेशरम रंग’मध्ये दीपिकाच्या शरीराचे काही क्लोज-अप शॉट्स काढून टाकण्यात आले आहेत. याचबरोबर गाण्यातील ‘बहुत तंग किया’च्या बोलांसह काही सेन्स्युस व्हिज्युअल्स देखील इतर शॉट्सने बदलण्यात आले आहेत. ‘बेशरम रंग’मधून दीपिकाची साइड पोझही काढून टाकण्यात आली आहे.
तर तपास यंत्रणा ‘रॉ’चे नाव बदलून ‘हमारे’ करण्यात आले आहे. ‘इससे सस्ती स्कॉच नहीं मिली’ या डायलॉगममध्ये स्कॉचच्या जागी ‘ड्रिंक’ हा शब्द वापरण्यात आला आहे. अशोक चक्राऐवजी ‘वीर पुरस्कार’, ‘एक्स-केजीबी’ला ‘एक्स-एसबीयू’ आणि ‘मिसेस भारतमाता’ ऐवजी ‘हमारी भारतमाता’ शब्दांचा वापर करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
चित्रपटातील एका दृश्यावर सुरू असलेल्या मजकुरात ‘ब्लॅक प्रिझन, रशिया’ बदलून ‘ब्लॅक प्रिझन’ करण्यात आले आहे. या बदलांसह सेन्सॉर बोर्डाने ‘पठान’च्या निर्मात्यांना ‘यु/ए’ रेटिंग दिले आहे. चित्रपटाचे किती सेकंदांचे फुटेज सेन्सॉर करण्यात आले आहे याबद्दल माहिती उघड करण्यात आलेली नाही.