गिनिज बुकमध्ये नावाची नोंद
सध्या जगाच्या नजरा टोकियो ऑलिम्पिकवर केंद्रीत झाल्या आहेत. आपल्या देशाच्या खेळाडूने पदक जिंकावे असे प्रत्येकाला वाटत आहे. याचदरम्यान अमेरिकेतील 99 वर्षांची महिला अनोख्या कामगिरीमुळे चर्चेत आली आहे. ही 99 वर्षांची महिला जगातील सर्वाधिक वयाची पॉवरलिफ्टर आहे.
8 ऑगस्ट म्हणजेच आजच एडिथ मुर्वे ट्रेन 100 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांचे नाव गिनिज बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. गिनिज वर्ल्ड रिकॉर्ड्सने स्वतःच्या इन्स्टा पेजवर त्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्या वर्कआउट करताना दिसून येतात.


हेविवेट उचलणारी सर्वात वृद्ध महिला माझी आई असल्याचे माहित होते. पण त्यांच्या नावावर विक्रम नोंदविला गेल्याचे कळल्यावर आनंदाला उधाण आल्याचे त्यांची कन्या हनी कोर्टेल यांनी म्हटले आहे.
नव्वदीपासून वर्कआउट
वयाच्या 90 व्या वर्षी एडिना वर्कआउट करायला लागल्या होत्या. त्यापूर्वी त्या एक नृत्य शिक्षिका होत्या. एका मित्राकडून माहिती मिळाल्यावर त्या वर्कआउट करू लागल्या. एडिथ दररोज जिममध्ये जातात. जीवनात आव्हाने स्वीकारणे त्यांना आवडते. सध्या त्या 30 किलो वजन उचलून बेंच प्रेस करतात.
डेडलिफ्ट पसंतीचे
वय अधिक असूनही एडिथ यांना डेडलिफ्ट पसंतीचे आहे. लोक त्यांना जिममध्ये वर्कआउट करताना पाहून थक्क होतात. इतकी कामगिरी करू शकेन याबद्दल मलाच विश्वास नव्हता असे त्या सांगतात. एडिथ यांची ही कामगिरी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.