मालदोलीत विश्व हिंदू परिषद संचलित प्रकल्पाचे उद्या उद्घाटन
प्रतिनिधी/ चिपळूण
दाभोळखाडी किनारी वसलेल्या आणि विश्वविख्यात अभियंता भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी आरेखित केलेला मालदोली येथील 22 खोल्यांचा भक्कम मराठे बंगला आता वृध्दांसाठी हक्काचे आणि आपुलकीचे घर ठरणार आहे. विश्व हिंदू परिषद संचलित रामचंद्र वासुदेव मराठे न्यासाचा उपक्रम म्हणून प्राधान्याने वृद्धांसाठी असणाऱया आनंदाश्रम या प्रकल्पाचे उद्घाटन 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता होत आहे.
विश्व हिंदू परिषदेला 1985 मध्ये मालदोली येथील मराठे कुटुंबियांकडून त्यांची मिळकत देणगीरूपाने मिळाली. सुमारे साडेसात एकर जागा, त्यामधील आंबा, कोकम, फणस, काजू आदी फळझाडे तसेच बकुळ, सोनचाफा व इतर सुगंधी फुलांचे विशालकाय फुलते वृक्ष, असंख्य साग व इतर दुर्मीळ वनस्पतींची झाडे या सर्व निसर्गवैभवासोबत वास्तूशास्त्राचा एक आगळावेगळा व सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी आरेखित केल्याची मौखिक माहिती सांगितली जाणारा 1920 च्या आसपास बांधला गेलेला 20 खोल्यांचा भक्कम बंगला या आनंदाश्रमासाठी उपलब्ध झाला आहे. 100 वर्षापूर्वी बांधलेल्या या ऐतिहासिक बंगल्यात प्रामुख्याने वृद्धांसाठीचा हा आनंदाश्रम साकारत असून सुरुवातीला येथे दहा स्त्राr-पुरुष वृद्धांची व्यवस्था केली जाणार आहे.
या वृद्धाश्रमातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आठवडय़ातून दोनवेळा डॉक्टर्स उपलब्ध होणार असून वृद्धांना आनंदाने राहता यावे, या दृष्टीने नियोजन करून विशेष लक्ष देण्यात येत आहे. विशेष म्हणजे वृद्धांनी येथे जास्तीत-जास्त आनंदात व सुखात रहावे, असे येथील वातावरण असल्याने या वृध्दाश्रमाचे आनंदाश्रम असे नामकरण करण्यात आले आहे. वृद्धांशिवाय ज्या कोणाला या वृद्धांच्या सान्निध्यात रहावयाचे असेल त्यांना पर्यटनात्मक दृष्टिकोनातून विचार करून पर्यटकांची व्यवस्थाही या आनंदाश्रमात करण्यात येणार आहे.
रविवारी उद्घाटन कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत मंत्री रामचंद्र रामुकाजी, आमदार शेखर निकम उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी मराठे न्यासचे अध्यक्ष प्रकाश साठे, सचिव श्रीकांत बापट, विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष जयंत देसाई, अनिरूध्द भावे, उदय चितळे, मंगेश बापट, बाळकृष्ण चव्हाण, सुधीर पोटे, व्यवस्थापक वांगीकर, माहिला आघाडीच्या मृदुला बापट, मंजुषा काणे, शीला बापट, श्रीमती नामजोशी आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.