गुप्तचर यंत्रणांकडे ठोस माहिती : बीएसएफ महानिरीक्षकांचे वक्तव्य
वृत्तसंस्था / श्रीनगर
सीमपेलिकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये 104-135 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची ठोस माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. भारतातून काही गाइड (वाट दाखविणारे) पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचले असून त्यांनाच या दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याची जबबादारी सोपविण्यात आल्याचा संशय आहे. बीएसएफ सीमेवरील सर्व घडामोडींवर बारकाईने नजर ठेवून आहे. सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांना मदत करणाऱयांच्या कुटुंबांवरही नजर ठेवली आहे. जम्मू-काश्मीरला शांततेला धक्का पोहोचविण्याची अनुमती देशविरोधी घटकांना देणार नसल्याचे उद्गार बीएसएफचे (काश्मीर क्षेत्र) महानिरीक्षक राजा बाबू सिंह यांनी सोमवारी काढले आहेत.
शस्त्रसंधीनंतर नियंत्रण रेषेवर शांततेचे वातावरण आहे, परंतु पाकिस्तानच्या मदतीने दहशतवाद्यांनी अनेकदा घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. आमचे जवान पूर्णपणे दक्ष असून हिमवृष्टी आणि पावसातही सीमेवर सतर्कता बाळगून आहेत. गुप्तचर यंत्रणांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हालचाली आढळून आल्या आहेत. लाँचिंग पॅडवर 104-135 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचे इनपूट मिळाले आहेत. घुसखोरीसाठी नियंत्रण रेषेला लागून असलेल्या गावांमधील काही गाइड नियंत्रण रेषा ओलांडून पीओकेत पोहोचले आहेत. याची माहिती मिळताच संबंधितांच्या घडामोडींवर नजर ठेवली जात असल्याचे बीएसएफच्या महानिरीक्षकांनी सांगितले आहे.
काश्मीर खोऱयात बीएसएफ नियंत्रण रेषेवरील 96 किलोमीटर लांब भागात सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहे. आमचे जवान आणि अधिकारी पूर्णपणे सतर्कत आहेत. दहशतवाद्यांची घुसखोरी उधळून लावण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. सैन्य आणि अन्य सुरक्षा यंत्रणांसोबत पूर्ण समन्वय ठेवून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर चोख प्रत्युत्तर दिले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ड्रोनचा धोका
ड्रोनद्वारे होणाऱया कारवाया सुरक्षा यंत्रणांसमोर नवे आव्हान आहे. दहशतवाद्यांचे म्होरके आणि पाकिस्तानी सैन्याची गुप्तचर यंत्रणा याचा वापर भारतीय भागांमध्ये शस्त्रास्त्र तसेच अमली पदार्थाच्या तस्करीसह भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हालचाली टिपण्यासाठी करत आहेत. या धोक्याला सामोरे जाण्यासाठी ड्रोनविरोधी प्रणालीचा वापर करण्यासह स्वतःचे ड्रोन खरेदी करत आहोत असे बीएसएफ महानिरीक्षकांनी म्हटले आहे.