काळम्मावाडी थेटपाईपलाईन योजना : इन्स्फेक्शनवेल, इनटेकवेल, विद्युतलाईनचे काम पूर्ण करण्याचे आव्हान :
टेस्टींगसाठीही लागणार 20 ते 25 दिवस
कोल्हापूर/ विनोद सावंत
यंदाच्या दिवाळीचे अभ्यंगस्नान काळम्मावाडी थेटपाईपलाईन पाण्यानेच केले जाणार असल्याचा दावा काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. ठेकेदार आणि महापालिका प्रशासनाही त्याला दुजारा देत आहे. इन्स्फेक्शनवेल, इनटेकवेल, बिद्री ते जॅकवेल विद्युतलाईन आणि टेस्टींग असे आव्हानात्मक कामे पूढील 100 दिवसांत पूर्ण केले तरच हे शक्य होणार आहे.
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी नव्यानेच स्थापन झालेल्या शिंदे गट आणि भाजप सरकारने खोडा घातला नाही तर यंदा दिवाळीचे अभ्यंगस्नान काळम्मावाडी थेटपाईपलाईनच्या पाण्याने होणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे थेटपाईपलाईन पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. दिवाळी 24 ऑक्टोंबर रोजी आहे. मुश्रीफांचे विधान सत्य होण्यासाठी ठेकेदार आणि महापालिकेकडे 100 दिवसांचा अवधी आहे. दोन्ही जॅकवेलचे काम अंतिम टप्प्यात आहे. धरणक्षेत्राच्या पाणी पातळीवर काम आल्याने आता पावसामुळे हे काम थांबणार नाही. ही जरी जमेची बाजू असली तरी भर पावसात इनटेकवेल आणि इन्स्फेक्शनवेल सारखी किचकट कामे करणे आव्हान आहे. शिवाय बिद्री ते जॅकवेल विद्युतलाईनची अद्यापही अपूर्ण आहे.
ट्रायलसाठी लागणार महिना
बिद्री ते जॅकवेल अशी विद्युतलाईनचे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत योजनेची ट्रायल घेत येत नाही. हे काम पूर्ण झाल्यानंतर ट्रायल घ्यावी लागणार आहे. ट्रायलमध्येच्ग् किमान 20 ते 25 दिवस जाणार आहेत. पूर्ण पाऊस गेल्यानंतरच हे करावे लागणार आहे.
दीड महिने झाले तरी मुदतवाढीचा निर्णय नाही
ठेकेदाराची चौथी मुदत 31 मे रोजी संपली आहे. त्यांनी सहा महिने मुदतवाढीचा प्रस्ताव दिला आहे. मुदत पूर्ण होवून दीड महिना झाले तरी यावर निर्णय झालेला नाही. मुदत वाढीशिवायच ठेकेदाराकडून काम सुरू आहे.
पावसातही काम, 300 कर्मचारी तैनात
सोळांकुरातील आव्हानात्मक पाईपलाईन टाकण्याचे पूर्ण झाले आहे. धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीवर जॅकवेलचे काम आल्याने पावसामध्येही काम सुरू आहे. दिवाळीपूर्वी सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन असून 300 कर्मचारी तैनात केली आहे.
-राजेंद्र माळी, प्रकल्प प्रमुख, जेकेसी कंपनी
मुदतवाढीच्या प्रस्तावावर लवकरच निर्णय
ठेकेदाराची चौथी मुदत संपली असून सहा महिने मुदतवाढीचा प्रस्ताव दिला असून तो कन्स्लटंट कंपनीकडून आला आहे. यावर मनपा प्रशासक निर्णय घेणार आहेत. दरम्यान, ठेकेदाराकडून काम करून घेतले जात आहे. रोज 50 हजार दंड सुरू असून कन्स्लटंटच्या अभिप्रायामध्ये यामध्ये वाढीची शिफारस नाही.
– हर्षजित घाटगे,प्रकल्प अधिकारी
थेटपाईपलाईनच्या कामाची सद्यस्थिती
जॅकवेल : दोन जॅकवेलपैकी एक जॅकवेलच्या लिप्टचे काम पूर्ण स्लॅब सुरू, दुसऱया जॅकवेलचे 29 पैकी 22 लिप्टचे काम पूर्ण
इनटेकवेल : जॅकवेल ते धरण क्षेत्रातील इटेकवेल अपूर्ण
इन्स्पेक्शन वेल : पावसामुळे कामाला अडथळा
बिद्री ते जॅकवेल विद्युतलाईन टाकणे : 27 किलोमीटरपैकी 6 किलोमीटर विद्युतलाईन टाकण्याचे काम शिल्लक
पाईपलाईन : 53 किलोमीटरपैकी 300 मीटरचे काम अपूर्ण (गॅप, व्हल्व बसविणे)
सोळांकुर गावातून पाईपलाईन टाकणे : पूर्ण
जलशुद्धीकरण केंद्र : काम पूर्ण
स्काडा यंत्रणा : पुईखडतील स्काडाचे (गळती शोधण्याची यंत्रणा) टेस्टींग बाकी