पुणे / प्रतिनिधी :
कोरोनावरील लशीच्या साठ्यापैकी शंभर दशलक्ष लशी मुदतबाह्य ठरल्याची माहिती सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी शुक्रवारी येथे दिली. लशीबाबत सार्वत्रिक उदासीनता असल्याने वर्धक मात्रेलाही मागणी नाही. लोकांना आणि मलाही आता कोरोना महासाथीचा कंटाळा आला असल्याचे मतही त्यांनी नोंदविले.
‘डेव्हलपिंग कन्ट्रीज व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स नेटवर्क’च्या (डीसीव्हीएमएन) पुण्यात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी पूनावाला यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. पूनावाला म्हणाले, कोविशिल्डचे उत्पादन डिसेंबर 2021 मध्ये थांबवले आहे. काही दशलक्ष लसमात्रांचा साठा त्या वेळी उपलब्ध होता. मात्र 100 दशलक्ष मात्रा या पूर्वीच मुदतबाह्य ठरल्या आहेत. कोव्होव्हॅक्स या लसीला पुढील दोन आठवडय़ात मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तसेच वर्धकमात्रेच्या मिश्रणाबाबत धोरणही जाहीर होऊ शकेल. जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्यास भारतीय नियामक संस्थांकडूनही मान्यता मिळेल. मात्र, सध्या वर्धक मात्रांना अजिबात मागणी नाही. लस घेण्याबाबत सार्वत्रिक उदासीनता आहे. स्पष्टपणे सांगायचे झाल्यास आता लोकांना कोरोना महासाथीचा कंटाळा आला आहे आणि मलाही कंटाळा आला आहे.
अधिक वाचा : ‘CTET’ परीक्षा डिसेंबर-जानेवारीमध्ये
भारतात तापासाठी लस घेण्याची संस्कृती नाही
भविष्यात लोक जेव्हा दरवषी लस घेतील, तेव्हा त्यात कदाचित कोरोना प्रतिबंधक लस आणि अन्य लशी एकत्र असू शकतील. ते कदाचित स्वतंत्र उत्पादन असू शकेल, असेही त्यांनी नमूद केले. पाश्चात्य देशांप्रमाणे भारतात तापासाठी लस घेण्याची संस्कृती नाही. आम्ही 2011 मध्ये स्वाइन फ्लूच्या महासाथीवेळी लस आणली होती. मात्र, कोणीही ती घेतली नाही. तापाची लोकांना भीती वाटत नाही. तसेच लोकांना लस घ्यायचीही नसते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.