द्रौपदी मुर्मू यांनाच सर्वाधिक मते मिळणार : मुख्यमंत्री
प्रतिनिधी /पणजी
राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत गोव्यातून 100 टक्के मतदान करण्यात आले. कोणत्याही प्रतिनिधीकडून तक्रार किंवा आक्षेप न घेता मतदान शांततेत आणि नियमांचे काटेकोर पालन करून पार पडले, अशी माहिती निर्वाचन अधिकारी नम्रता उल्मन यांनी दिली.
सकाळी 9.10 वाजता स्ट्राँगरूम उघडण्यात आली व त्यानंतर सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि सर्व 40 आमदारांनी दुपारी 1.50 पर्यंत मतदान केले. तीन महिला मतदारांनीही मतदान केले, असे उल्मन यांनी सांगितले.
दोन्ही उमेदवारांचे अधिकृत प्रतिनिधी आणि सर्व अधिकाऱयांच्या उपस्थितीत संध्याकाळी 5 वाजता मतपेटी आणि अन्य संबंधित निवडणूक साहित्य त्यानंतर सीलबंद करण्यात आले. आज 19 रोजी दुपारी 12.40 वाजता हे साहित्य दिल्लीत पोहोचणार आहे. दि. 21 रोजी निकाल जाहीर होणार आहे.
दरम्यान, स्वतःचे मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना गोव्यात 25 पेक्षा जास्त मते मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही सर्व आमदारांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
देशाचे 15वे राष्ट्रपती निवडण्यासाठी गोव्यातील आमदारांनी सोमवारी सकाळी मतदान केले. भाजपचे 20 आमदारांसह मगोचे 2 आणि अपक्ष 3 आमदारांनी यापूर्वीच एनडीए उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यांची संख्या 25 झाली आहे.
त्याशिवाय भाजपचे 2 आणि काँग्रेसच्या एका खासदाराने मतदान केले. उर्वरितांमध्ये 11 काँग्रेस, 2 आप, 1 गोवा फॉरवर्ड आणि 1 आरजी आमदार आहे. त्यापैकी किती जणांनी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केले आहे ते पाहणे बाकी आहे. एनडीएतर्फे मुर्मू तर विरोधी पक्षातर्फे यशवंत सिन्हा हे उमेदवार होते.
व्हिप जारी करू शकत नाही : फरेरा
दरम्यान, राष्ट्रपतीपदाची निवडणूक पक्षीय पातळीवर लढवली जात नसल्याने व्हिप जारी करता येत नाही. प्रत्येकाने सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे लागेल, असे काँग्रेस आमदार कार्लोस फरेरा यांनी सांगितले. आम्ही सर्व 11 ही आमदार एकत्र आहोत, असेही ते ठामपणे म्हणाले.
या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने संकल्प आमोणकर, कार्लोस अल्वारेस फरेरा, युरी आलेमाव, अल्टोन आणि रुफॉल्फ फर्नांडिस या पाच आमदारांना चेन्नई येथे नेले होते. रविवारी रात्री ते गोव्यात परतले होते. दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि आलेक्स सिक्वेरा हे सहा आमदार गोव्यात होते. त्यांच्यापैकी कुणी कुणाला मतदान केले ते समजलेले नाही.