आज दुपारपर्यंत लागणार निकाल : 12 जागांसाठी 38 उमेदवारांमध्ये चुरस
प्रतिनिधी /फोंडा
गोवा राज्य सहकारी दुग्ध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीच्या 12 संचालक मंडळाच्या निवडीसाठी रविवारी मतदान झाले. तीन पॅनलमध्ये झालेल्या या चुरशीच्या लढतीत एकूण 167 मतदारांपैकी 166 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. कुर्टी-फोंडा येथील सहकार भवनमध्ये मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया पार पडली. आज सोमवार 20 रोजी सकाळी 11 वा. मतमोजणी होऊन दुपारर्पंत निकाल जाहीर होणार आहे.
राज्यातील दूध उत्पादन क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या गोवा डेअरीचे राज्यभरात पाच हजारहून अधिक सदस्य आहेत. मात्र मतदानाचा अधिकार स्थानिक दूध संस्थाच्या अध्यक्षांना असतो. संचालक मंडळाच्या 12 जागांसाठी एकूण 43 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 5 अर्ज बाद झाल्याने 38 उमेदवार रिंगणात होते. रविवारी झालेल्या निवडणुकीत 167 मतदारांपैकी 166 जणांनी मतदान केले. शिरोडय़ातील एक मतदार आजारी असल्याने तो मतदानाला उपस्थित राहू शकतला नाही. प्रत्येक मतदाराला प्रत्येकी 12 मते देण्याचा अधिकार आहे. सकाळी 9 वा. मतदानाला प्रारंभ झाला व सायं. 4 वा. पर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. एकंदरीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. निर्वाचन अधिकारी म्हणून राज्य सहकार खात्याचे अधिकारी राजू मगदूम यांनी काम पाहिले.
तीन पॅनल्समध्ये चुरस
माजी अध्यक्ष माधव सहकारी, श्रीकांत नाईक व विठोबा देसाई आणि राजेश फळदेसाई या तीन पॅनलमध्ये ही अटीतटीची लढत झाल्याने आज होणाऱया निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गोवा डेअरीची ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री व सहकारमंत्री शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले होते. निवडणूक प्रक्रिया सदोष असून ती रद्द करावी अशी आव्हान याचिकाही उच्च न्यायलयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका फेटाळली गेल्याने अखेर निवडणूक पार पडली. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे.