कौन्सिलिंगची प्रक्रिया पूर्ण, शिक्षणाधिकाऱयांच्या हस्ते शिक्षकांना नियुक्ती पत्र
प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक शिक्षण विभागाच्यावतीने मंगळवारी क्लब रोड येथील बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील प्राथमिक शिक्षकांचे कौन्सिलिंग पूर्ण झाले. सहशिक्षक, मुख्यशिक्षक या पदासाठी कौन्सिलिंग झाले. शिक्षकांना हव्या असलेल्या जागी बदली देण्यात आली. त्यामुळे मंगळवारी एकूण 101 शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पडली.
मागील अनेक दिवसांपासून बदलीची प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे रिक्त असलेल्या जागा मागील अनेक दिवसांपासून तशाच होत्या. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या जागांसाठी लवकर बदली प्रक्रिया राबवावी, अशी मागणी होत होती. अखेर या कौन्सिलिंगला मंगळवारी मुहूर्त मिळाला.
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील प्राथमिक शिक्षक मंगळवारी सकाळपासूनच क्लब रोड येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयात उपस्थित होते. आपल्याला अनुकूल होईल, अशा शाळांमध्ये शिक्षक प्रथम प्राधान्य देत होते. कौन्सिलिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षणाधिकाऱयांच्या हस्ते शिक्षकांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या कौन्सिलिंगसाठी नोडल अधिकारी म्हणून एम. पॅटी यांनी काम पाहिले. त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. या कौन्सिलिंगमुळे ज्या जागा रिक्त होत्या त्याठिकाणी आता शिक्षक उपलब्ध होणार आहेत.