एकूण 18 हजार विद्यार्थी बसणार परीक्षेला
प्रतिनिधी/ पणजी
दहावी – बारावीची प्रथम सत्र परीक्षा येत्या 10 नोव्हेंबरपासून सुरु होणार असून यंदा पेपर्स दुपारी 2.30 वा.पासून चालू होणार आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंदात दुपारी 2 वाजेपर्यंत हजर राहावे, अशी सूचना गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) केली आहे.
दोन्ही परीक्षांसाठी प्रत्येकी सुमारे 18 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दुसरी सत्र परीक्षा 1 एप्रिल 2023 पासून सुरु होण्याची शक्यता बोर्डाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
बोर्डाने दहावी – बारावी परीक्षार्थिंसाठी विशेष मूल्यमापन योजना सुरु केली असून दोन्ही परीक्षांच्या अभ्यासक्रमाची दोन समान भागात विभागणी केली आहे. पहिल्या भागाची परीक्षा प्रथम सत्रात तर दुसऱया भागाची परीक्षा दुसऱया सत्रात घेण्यात येणार आहे. दहावीची परीक्षा 29 नोव्हेंबर रोजी तर बारावीची परीक्षा 25 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. या परीक्षेचे परिपत्रक बोर्डातर्फे जारी करण्यात आले असून ते सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना पाठविण्यात आले आहे. या दोन्ही परीक्षांना पंधरवडय़ाचा कालावधी बाकी असून दिवाळीच्या सुट्टीनंतर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.