प्रतिनिधी /पणजी
गोवा बोर्डाची दहावी-बारावी प्रथम सत्र परीक्षा येत्या 10 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून दुसरी परीक्षा अनुक्रमे 1 मार्च (दहावी), व 1 एप्रिल (बारावी) पासून घेण्यात येणार आहे. दोन्ही परीक्षांसाठी नोंदणी करण्यासाठी बोर्डाने अर्ज मागवले असून ती प्रक्रिया 8 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर अशी महिनाभर चालणार आहे.
दोन वर्षे कोरोना महामारीत गेल्यानंतर 2021-22 पासून गोवा बोर्डाने 2 सत्र परीक्षा घेण्यास सुरुवात केली आणि तीच पद्धत चालू 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी कायम ठेवली आहे. बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार बारावीची प्रात्यक्षिक 1 फेब्रुवारी 2023 पासून घेण्यात येणार आहे. एप्रिल 2022 मध्ये दहावी-बारावी अशा दोन्ही परीक्षांना बसलेले विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील दोन्ही सत्र परीक्षांना गुण वाढवण्यासाठी शकतात किंवा ते फक्त दुसरी सत्र परीक्षाही पूर्ण अभ्यासक्रमासाठी देऊ शकतात, असे परिपत्रकातून नमूद करण्यात आले आहे.
बोर्डाच्या नवीन मूल्यांकन पद्धतीनुसार अभ्यासक्रम दोन सत्र परीक्षांत समान विभागण्यात आला असून दोन्ही परीक्षांच्या सरासरीनुसार शेवटी गुण ठरवण्यात येत असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.