पुणे / प्रतिनिधी :
10th-12th supplementary examination result today राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर विषयनिहाय गुण उपलब्ध होतील. तसेच निकालाची प्रत घेता येईल, अशी माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली.
दहावीची पुरवणी परीक्षा दि. 27 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत, तर बारावीची पुरवणी परीक्षा दि. 21 जुलै ते 24 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी व इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी आहे. ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी व बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गुणपडताळणीसाठी दि. 3 सप्टेंबर ते 12 सप्टेंबरपर्यंत व छायाप्रतीसाठी दि. 3 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. जुलै-ऑगस्ट 2022 पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.