ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पेपरला कॉपी करू न दिल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकावर दगडफेक केल्याची घटना मनमाडमधील एका विद्यालयात घडली. या दगडफेकीत शिक्षकाच्या डोक्याला आणि डोळ्याला मार लागला आहे. याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांवर मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (दि.20) दहावीच्या विज्ञान-2 या विषयाचा पेपर होता. मनमाडमधील एचएके महाविद्यालयात शिक्षक निलेश दिनकर जाधव यांच्यावर परीक्षेच्या सुपरव्हिजनचे काम सोपवण्यात आले होते. त्यांनी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कॉपी करू न दिल्याने काही विद्यार्थी संतप्त होते. पेपर सुटल्यानंतर त्यांनी शिक्षक जाधव यांच्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत जाधव यांच्या डोक्याला आणि डोळ्याला जखम झाली आहे. या हल्ल्यामुळे जाधव यांचा गोंधळ उडाला होता. त्यांनी थेट मनमाड पोलीस ठाणे गाठत विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दिली.
अधिक वाचा : सराईत गुन्हेगाराने धावत्या रेल्वेतून पत्नी-मुलीला फेकले, मुलीचा मृत्यू
बोर्डाच्या नियमानुसार मी सुरव्हिजन करत होतो. काही विद्यार्थ्यांना कॉपी करता आली नाही, त्यामुळे त्यांच्या मनात राग होता. पेपर सुटल्यानंतर शाळेच्या गेटवरच त्यांनी माझ्यावर दगडफेक केली, अशी तक्रार जाधव यांनी पोलिसांत दिली आहे.