प्रदर्शित होणार अनुपम खेर यांचा ‘द काश्मीर फाईल्स’
अनुपम खेर यांचा चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ दीर्घकाळापासून चर्चेत आहे. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचे दुःख मांडणारा हा चित्रपट विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे. सत्य घटनांवर प्रेरित हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. देशात कोरोना संक्रमण आणि लॉकडाउनमुळे याचे प्रदर्शन यापूर्वी पुढे ढकलण्यात आले होते.
चित्रपट प्रदर्शनाच्या नव्या तारखेची घोषणा करताना विवेक अग्निहोत्री तसेच अनुपम खेर यांनी ट्विट केला आहे. आम्ही काश्मीर नरसंहाराची कहाणी मोठय़ा पडद्यावर आणत आहोत असे ट्विटमध्ये म्हटले गेले आहे. याचबरोबर हॅशटॅग राइट टू जस्टिसचा वापर करण्यात आला आहे.
1990 च्या दशकाच्या प्रारंभी काश्मिरातील दहशतवादामुळे काश्मिरी हिंदूंच्या पलायनाची कहाणी मांडणारा हा चित्रपट आहे. 2019 मध्येच विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटावर काम सुरू केले होते. या चित्रपटात योगराज सिंह हे काम करणार होते. परंतु शेतकरी आंदोलनादरम्यान वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना चित्रपटातून वगळण्यात आले होते. त्यांच्या जागी मिथुन चक्रवर्ती यांची निवड करण्यात आली होती.
‘ब्रह्मा दत्त’ ही व्यक्तिरेखा मिथुन चक्रवर्ती साकारत आहेत. ‘पुष्करनाथ’ ही व्यक्तिरेखा अनुपम खेर साकारत असून ‘कृष्णा पंडित’ या भूमिकेत दर्शन कुमार दिसून येणार आहेत. याचबरोबर चित्रपटात पल्लवी जोशी, भाषा सुंबली, चिन्मय मांडलेकर आणि पुनीत इस्सर देखील आहेत. चित्रपटाची निर्मिती झी स्टुडियोज, आयऍमबुद्धा आणि अभिषेक अग्रवाल आर्ट्स बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे.