ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरील शाईफेकप्रकरणी 11 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये 8 पोलीस शिपाई आणि 3 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वादग्रस्त विधान पाटील यांनी मागील आठवडय़ात केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी पाटील चिंचवडगावात एका कार्यक्रमासाठी आले असता यांच्या तोंडावर शाई फेकण्यात आली. शाईफेकप्रकरणी समता सैनिक दलाचे संघटक मनोज भास्कर घरबडे, समता सैनिक दल सदस्य धनंजय भाऊसाहेब ईचगज आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओवाळ यांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांवरही भादवि कलम 307, 353, 294, 500, 501, 120 (ब) 34 क्रिमिनल अमेंन्डमेंन्ट ऍक्ट कलम 7 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कडेकोट बंदोबस्त असतानाही पाटील यांच्यावर शाईफेकीचा प्रकार कसा घडला, यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांवर कारवाई करु नका, त्यांची यामध्ये काहीही चूक नाही, अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र, तरीही या प्रकरणात 11 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.