आर्थिक वर्ष 2022-23 साठीचे बजेट- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन चौथ्यांदा सादर करणार बजेट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अर्थ मंत्रालयाकडून 12 ऑक्टोबरपासून 2022-23 साठी वार्षिक अर्थसंकल्प (बजेट) तयार करण्याची रंगीत तालिम होणार आहे. कोविड महामारीमुळे प्रभावीत झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणांकरीता बजेटची तयारी करण्यास प्रारंभ केला आहे. रोजगार आणि जीडीपीमधील वाढ यासारख्या महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हे चौथे बजेट राहणार आहे.
बजेट विभागाकडून सादर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार आर्थिक वर्ष 2022-23 साठी सादर करण्यात येणाऱया बजेट संदर्भात बजेट पूर्व बैठकांना येत्या 12 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. सदरच्या बैठकीमध्ये अर्थ विभागाचे सचिव आणि आर्थिक सल्लागारासोबत बजेटवर चर्चा करण्यात येणार असून त्यानंतर अर्थसंकल्पाला अंतिम रुप देण्यात येणार आहे. ही बैठक नोव्हेंबरच्या दुसऱया आठवडय़ापर्यंत सुरु राहणार आहे.
सादर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार केंद्रीय क्षेत्र आणि केंद्र प्रायोजित योजनांसह सर्व प्रकारच्या खर्चावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच विविध योजनांसह 2021-22 आणि 2022-23 मधील उत्पन्न आणि भांडवली खर्चासोबत अन्य गोष्टींवर चर्चा घडवून आणली जाणार असल्याचे नमूद केले आहे.