60 वर्षावरील ज्येष्ठांना बुस्टर डोसलाही अनुमती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार 12 ते 14 या वयोगटातील मुलांसाठी बुधवार, 16 मार्चपासून लसीकरण सुरू होणार आहे. या मुलांच्या लसीकरणासाठी बायोलॉजिक ईएस कंपनीची कोर्बेवॅक्स लस दिली जाण्याची शक्मयता आहे. लहान मुलांबरोबरच आता 60 वर्षावरील ज्येष्ठांना बुस्टर डोस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने मोहिमेची व्याप्ती वाढविताना याआधी 60 वर्षावरील व्यक्तींना बुस्टर डोस घेण्यासाठी असलेले नियम शिथील केले आहेत.
‘एनटीएजीआय’ने 12 ते 14 या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार आता 2008, 2009 आणि 2010 मध्ये जन्मलेल्यांना लसीकरणासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. आता बुधवारपासून सुरू होणाऱया लसीकरणात त्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यापूर्वी जानेवारीपासून 14 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरण सुरू आहे.
भारतात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला होता. आरोग्य कर्मचाऱयांसह प्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा मिळालेल्या कर्मचाऱयांना बुस्टर डोस देण्यात येणार होता. त्याशिवाय, आजारांनीग्रस्त असलेल्या 60 वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस घेण्याची मुभा देण्यात आली होती.
लहान मुलांना ‘कार्बेवॅक्स’ लस
12 ते 14 वयोगटातील मुलांना कार्बेवॅक्स ही लस देण्यात येणार आहे. बायोलॉजिकल ई कंपनीने ही लस तयार केली आहे. कार्बेवॅक्स ही रीकॉम्बीनंट प्रोटीन सब-युनिट लस आहे. ही लस एमआरएनए आणि इतर लसींप्रमाणेच स्पाइक प्रोटीनला लक्ष्य करत असते. परंतु याची पद्धत वेगळी असते. कार्बेवॅक्सचे दोन डोसही द्यावे लागतील. ते बनवण्यासाठी कमी खर्चाच्या पद्धती वापरण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही सर्वात स्वस्त लसींपैकी एक असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
देशभरात 180 कोटी डोस
कोरोनाविरोधी देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत गेल्या 24 तासात 4 लाख 61 हजार 318 कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण 180 कोटी 19 लाख 45 हजार 779 डोस देण्यात आले आहेत.