मुलांच्या लसीकरणाला येणार गती : आतापर्यंत 15 ते 18 वयोगटातील 3.45 कोटी मुलांना डोस प्राप्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे (एनटीएजीआय) प्रमुख एन. के. अरोरा यांनी ही माहिती दिली. यापूर्वी 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण कार्यक्रम सुरू झाला होता. देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 157 कोटी 81 लाख 34 हजार 870 डोस देण्यात आले आहेत. यापैकी 91 कोटी 34 लाख 71 हजार 305 जणांनी पहिला डोस घेत मोठी मजल गाठली आहे.
भारतातील 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्यास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस 12 ते 18 वर्षे वयोगटात दिली जाऊ शकते. सध्या ही लस 15 ते 18 वयोगटाला दिली जात आहे. मार्चपर्यंत 15 ते 18 वयोगटातील बहुतांश मुलांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर 12 ते 15 वयोगटातील मुलांचे लसीकरणही सुरू होऊ शकते, अशी खात्रीलायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ‘एनटीजीएआय’च्या सूत्रांनी सोमवारी दिली. यासंबंधी अंतिम निर्णय राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समिती बैठकीत घेणार आहे. त्यानंतर पंतप्रधान किंवा आरोग्य मंत्रालयाकडून निश्चित तारखेची घोषणा केली जाऊ शकते.
या वर्षाच्या सुरुवातीपासून 15 ते 18 वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू झाले आहे. देशात 15 ते 18 वयोगटातील जवळपास 8 कोटी मुले आहेत. कोविन पोर्टलनुसार, आतापर्यंत 3 कोटी 45 लाख 35 हजार 664 जणांना लसींचा पहिला डोस देण्यात आला आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये वेगाने लसीकरण होत असून जानेवारी अखेरपर्यंत 7.4 कोटी मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य झाल्यास फेबुवारीमध्ये सदर लस लाभार्थींना पुढील महिन्यात दुसरा डोस मिळाल्यानंतर फेब्रुवारी अखेरीस लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर 12 ते 15 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.