30 हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार- मार्च ठरणार आयपीआंचा महिना
वृत्तसंस्था/ मुंबई
मार्च महिना हा आयपीओसाठी मोठी उलाढाल राहणारा ठरणार आहे. याच महिन्यात एकूण 12 ते 15 कंपन्यांचा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता सांगितली जात आहे. या आयपीओच्या आधारे कंपन्या जवळपास 30 हजार कोटी रुपये उभारण्याचे संकेत आहेत. वर्षभरातील एकाच महिन्यात इतक्या मोठय़ा प्रमाणात आयपीओ सादरीकरण होणार आहे. यातील एमटीएआर टेक्नॉलॉजीचा आयपीओ येत्या 3 मार्च रोजी खुला होणार असल्याची माहिती आहे.
चालू आर्थिक वर्षातील संपूर्ण कालावधी हा कोरोनामुळे प्रभावीत झाला होता. परंतु सध्या काही प्रमाणात परिस्थिती सुधारत असून शेअर बाजार पुन्हा आपली तेजी प्राप्त करत आहे. दुसऱया बाजूला आयपीओ बाजाराच्या बळावर नवा उच्चांक निर्माण होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
एमटीएआरचा आयपीओ 5 मार्च रोजी बंद होणार आहे. तर यासोबतच मार्चमध्ये अनुपम रसायन, लक्ष्मी ऑर्गेनिक, सुर्योदय बँक, बार्बीक्यू नेशन, नजारा टेक्नॉलॉजी, आधार हाऊसिंग फायनान्स, कल्याण ज्वेलर्स, इंडिया पेस्टिसाइड आदि कंपन्यांचे आयपीओ बाजारात येण्याचे संकेत आहेत.
ऑगस्टपासून आयपीओंमध्ये तेजीचे वारे
आयपीओ सादरीकरण मागील वर्षातील ऑगस्ट महिन्यापासून अतिशय वेगाने सुरु झाल्याचे समोर आले. यामधून शेअर बाजारामध्ये मोठय़ा प्रमाणात पैसा येऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले. सदर कामगिरीत कॉर्पोरेट कंपन्यांची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. 2020 मध्ये आयपीओमधून 43,800 कोटी रुपयांची भर पडली आहे.
सेबीकडून मंजुरी मिळालेल्या कंपन्या
मंजुरीमध्ये ट्रिप प्लानर्स, पुराणिक बिल्डर्स, सुर्योदय बँक, बार्बीक्यू, ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक आणि कल्याण ज्वेलर्स आदींचा समावेश आहे.