Tarun Bharat

‘श्रेडर मशिन’मध्ये 12 किलो प्लास्टिक बॉटल्स

महापालिकेचा स्तुत्य उपक्रम : शहरात पाच ठिकाणी मशिन : संकलित बॉटल्सचा वापर डांबरासाठी

कोल्हापूर /विनोद सावंत

महापालिकेने शहरात पाच ठिकाणी प्लास्टिक श्रेडर मशिन ठेवले आहेत. यात रिकाम्या प्लास्टिकच्या बॉटल टाकण्याची सोय केली आहे. यामधून साडेतीन महिन्यांत 12 किलो 250 ग्रॅम प्लास्टिक बॉटल संकलित झाल्या आहेत. या बॉटल्सचा वापर डांबर करून पॅचवर्कसाठी केला जाणार आहे.

कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर असल्याने मोठया संख्येने भाविक आणि पर्यटक येतात. नवरात्रोत्सवात तर 25 लाख भाविकांनी अंबाबाई मंदिरात भक्तांनी दर्शन घेतल्याची नोंद आहे. तसेच शहरातच सर्व शासकीय कार्यालय असल्याने लगतच्या गावातील व उपनगरातील नागरिकही कामानिमित्त तसेच खरेदीसाठी शहरात येतात. भाविक, पर्यटक, स्थानिक नागरिकांचा शहरातील पलो दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यांच्याकडून पिण्यासाठी मिनरल बॉटल्स खरेदी केल्या जातात. त्या रिकाम्या झाल्यानंतर कुठेही फेकून दिल्या जातात. रिकाम्या बॉटल्स गटरीत गेल्यामुळे ड्रेनेजलाईन तुंबते. तसेच पंचगंगा प्रदूषणातही भर पडते.

यंदा तर काही तासाच्या पावसामुळे रस्त्यांना तळय़ाचे स्वरूप आल्याचे आढळून आले. यावेळी महापालिकेने ड्रेनेज सफाई करताना प्लास्टिकच्या बॉटल्स मोठय़ा संख्येने आढळून आल्या. प्लास्टिक बॉटल्समुळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याचे यातून समोर आले. जयंती नाल्यातही मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक बॉटल्स येतात. त्यामुळे नागरिकांना प्लास्टिक बॉटल कुठेही फेकून देवू नका, असे आवाहन करण्यात आले. याचा फारसा परिणाम झाल्याचा दिसून आला नाही. त्यामुळे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी यावर अनोखा उपाय शोधून काढला. त्यांनी शहरात पर्यटक आणि भाविकांची गर्दी होणाऱया पाच ठिकाणी प्लास्टीक श्रेडर मशिन ठेवण्याचा निर्णय घेतला. हे मशिन खरेदीसाठी 14 व्या वित्त आयोगातून 14 लाखांचा निधी मिळाला होता. यासाठी 14 निविदा आल्या होत्या. त्यामध्ये बायोक्रुक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून सर्वात कमी दराने आलेली निविधा मंजूर केली. यानुसार 9 लाख 80 हजारांची पाच मशिन घेतली. 15 ऑगस्ट 2022 रोजी ही मशिन कार्यन्वित केली.

प्लास्टिक श्रेडर मशिन ठेवलेली ठिकाणे

बिंदू चौक पार्किग, अंबाबाई मंदिर परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, संगीतसूर्य केशवराव भोसले नाटयगृह, रंकाळा चौपाटी परिसर

भारत सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयातर्फे प्लास्टिक वेस्ट (मॅनेजमेंट ऍण्ड हॅण्डलिंग) नियम केले आहेत. यानुसार महापालिकेच्यावतीने शहरात रोज निर्माण होणारा प्लास्टीक बॉटल संकलित करणारे श्रेडींग मशिन बसविले. 15 ऑगस्टपासून आतापर्यंत 12 किलो 250 ग्रॅम प्लास्टिक संकलित झाले असून ते डांबर करण्यासाठी देण्यात येणार आहे.
डॉ. विजय पाटील, प्रभारी मुख्य आरोग्य निरिक्षक, महापालिका

मशिन दर्शनी ठिकाणी लावण्याची गरज

सध्या पाच ठिकाणी लावलेली मशिन पर्यटक आणि भाविकांना दिसून येत नाहीत. त्यामुळे मनपाने ती दर्शनी ठिकाणी लावणे आवश्यक आहे. तसेच त्या परिसरात मशिनमध्येच प्लास्टिक टाका असे लिहीलेले फलकही लावणे आवश्यक आहे. प्लास्टिक बॉटल्स मशिनमध्ये टाकल्यास संबंधितास एक रूपयांचा रिफंड देण्याची सोयही काही शहरात आहे. असे कोल्हापूर महापालिकेने केल्यास 100 टक्के प्लास्टिक बॉटल्स मशिनमध्येच टाकल्या जातील.

Related Stories

कुंभोज आठवडी बाजारात महिलेचे दागिने लांबवले; पोलिसांचे दुर्लक्ष

Abhijeet Khandekar

विशाळगडावर ढोल ताशाच्या गजरात पार पडला नरसोबा मंदिर लोकार्पण सोहळा

Archana Banage

गगनबावडा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीवर प्रशासक

Archana Banage

कोल्हापूर महिला संघाची राज्य रग्बीत विजेतेपदाची हॅट्ट्रिक

Kalyani Amanagi

कोल्हापूर : अब्दुललाट येथे ग्रामपंचायतीच्या दारातच लावला कचऱ्याचा ढीग

Archana Banage

‘ स्वाभिमानी’ कडून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण, बांधकाम विभागास आली जाग

Archana Banage