बंद घराचा कडीकोयंडा तोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
प्रतिनिधी /बेळगाव
मराठा कॉलनी, टिळकवाडी (नानावाडी रोड) येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे 12 लाखांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी चोरीची ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
अभियंते सूरज मल्लाप्पा मासेकर यांच्या घरी चोरी झाली आहे. चोरटय़ांनी 492 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 किलो चांदी, 50 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे 11 लाख 83 हजार रुपये किमतीचा ऐवज पळविला आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. गुरुवार दि. 26 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता आपल्या घराला कुलूप लावून सूरज व त्यांचे कुटुंबीय खानापूरला गेले होते. शुक्रवारी 27 मे रोजी सकाळी दरवाजा उघडा पाहून घर मालकांनी सूरज यांच्याशी संपर्क साधला. ते बेळगावात दाखल झाले. त्यावेळी घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले.
घटनेची माहिती समजताच टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. गेल्या एक-दीड महिन्यापासून शहर व उपनगरांतील बंद घरे चोरटय़ांचे लक्ष्य बनली आहेत.