इस्रायली संशोधकांनी वाढविले उंदराचे आयुष्य
कोरोना महामारीदरम्यान इस्रायलमधून एक चांगली बातमी समोर आली आहे. इस्रायलच्या वैज्ञानिकांनी उंदराचे जीवन 23 टक्क्यांपर्यंत वाढविण्याची पद्धत शोधून काढली आहे. या अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधनाला माणसांवर लागू केल्यास मानवी जीवन 120 वर्षांपर्यंत पेहोचू शकते. संशोधनादरम्यान वैज्ञानिकांनी ‘एसआयआरटी6’ नावाच्या प्रोटीनचा पुरवठा वाढवून 250 उंदरांचे आयुष्य 23 टक्क्यांपर्यंत वाढविले आहे.
‘एसआयआरटी6’ प्रोटीन सर्वसाधारणपणे वृद्धावस्थेची प्रक्रिया कमकुवत करतो. जर्नल नियतकालिकात प्रकाशित संशोधनात वैज्ञानिकांनी ‘एसआयआरटी6’ प्रोटीनने भरपूर प्राण्यांमध्ये कर्करोगाची लागण होण्याचा धोका कमी असतो असे सांगितले आहे. आयुष्मानात बदल अत्यंत महत्त्वूर्ण असल्याचे उद्गार बार इलान विद्यापीठातील प्राध्यापक हॅम कोहेन यांनी काढले आहेत.
2-3 वर्षांमध्ये मानवी परीक्षण
उंदरांमध्ये आम्ही जो बदल पाहिला आहे, तो माणसांमध्येही लागू केला जाऊ शकतो. असे घडल्यास हे अत्यंत रोमांचक ठरणार असल्याचे ते म्हणाले. कोहेन यांची लॅब सुरक्षित पद्धतीने मानवी शरीरात ‘एसआयआरटी6’ प्रोटीन वाढवू शकणाऱया औषधांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्राण्यांमध्ये प्रोटीनची पातळी वाढविण्यास यशस्वी ठरणारे कोहेन 2012 मध्ये पहिले संशोधक ठरले होते.
2012 मध्ये नर उंदरांचे जीवन 15 टक्क्यांनी वाढले होते, पण मादी उंदरांवर याचा कुठलाच प्रभाव पडला नव्हता. ‘एसआयआरटी6’ प्रोटीनचे प्रमाण वाढविल्याने नर आणि मादी दोन्ही प्रकारच्या उंदरांचे आयुष्य वाढल्याचे नव्या संशोधनात दिसून आले आहे. संशोधनादरम्यान नराचे वय 30 टक्के तर मादीचे वय सुमारे 15 टक्क्यांनी वाढले आहे.