मनपाकडून कारवाई सुरू : दोन दिवसांत 35 हजाराचा दंड वसूल
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील व्यावसायिकांकडे व्यवसाय परवान्याची तपासणी करा, अशी सूचना आयुक्तांनी दिल्याने मनपाच्या आरोग्य विभागाचे पथक कार्यरत झाले आहे. शहरातील विविध भागातील व्यावसायिकांकडे परवान्याची विचारणा करण्यात येत असून व्यवसाय परवाना नसलेल्या 120 व्यावसायिकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच दंडात्मक कारवाई करून 35 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
आरोग्य विभागाच्या कामकाजाच्या आढावा बैठकीवेळी व्यवसाय परवान्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. महापालिका व्याप्तीमध्ये केवळ 9 हजार व्यवसाय परवाने घेण्यात आल्याची माहिती आयुक्तांना देण्यात आली होती. त्यामुळे 20 हजारांहून अधिक व्यावसायिक मालमत्ता असून यापेक्षाही जास्त व्यवसाय सुरू आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक व्यावसायिकांकडे परवान्याची विचारणा करा, जर व्यवसाय परवाना नसल्यास दंडात्मक कारवाई करण्याची सूचना महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी केली होती. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी जागे झाले आहेत. शहरातील विविध भागात सुरू असलेल्या व्यावसायिकांकडे परवान्याची चौकशी करण्याची मोहीम दोन दिवसांपासून राबविण्यात येत आहे.
बाजारपेठ व्याप्तीमध्ये व्यावसायिक आस्थापने मोठय़ा संख्येने आहेत. व्यावसायिक व्यापारी संकुले असल्याने प्रत्येक संकुलामध्ये लहान-मोठे व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. बहुतांश व्यावसायिकांनी व्यवसाय परवाने घेतले, पण नूतनीकरण केले नसल्याचे निदर्शनास येत आहे.
प्रत्येक बाजारपेठेतील प्रत्येक दुकानात चौकशी करून व्यवसाय परवान्याची पाहणी, त्याची मुदत पाहण्यात येत आहे. जर व्यवसाय परवाना नूतनीकरण केला नसल्यास त्यांना नोटीस बजाविण्यात येत आहे. काही व्यावसायिकांनी वर्षांनुवर्षे व्यवसाय परवाना घेतला नसल्याचे निदर्शनास आल्याने दंड वसूल करण्यात आला आहे.
व्यावसायिकांना 7 दिवसांची मुदत
चार आरोग्य निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. बाजारपेठेत व्यवसाय परवाना न घेतलेल्या 120 व्यावसायिकांना नोटीस बजाविण्यात आले. तसेच 35 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. व्यवसाय परवाना नसलेल्या व्यावसायिकांना 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. व्यवसाय परवान्यासाठी लागणारी विविध कागदपत्रे जमा करून अर्ज करण्याची सूचना करण्यात आली आहे. जर 7 दिवसांत व्यवसाय परवान्यासाठी अर्ज न केल्यास दुसऱयांदा नोटीस देण्यात येईल. दुसऱया नोटीसकडे व्यावसायिकांनी दुर्लक्ष केल्यास व्यवसाय बंद करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा विनापरवाना व्यावसायिकांना देण्यात आला आहे.
या कारवाईवेळी आरोग्य निरीक्षक संतोष कुरबेट, एम. एन. आदीवासी, सादिक धारवाडकर, श्रवण कांबळे, सुपरवायझर किल्लेकर, मोहिते, बसवराज, शाहू, सावंत आदींसह मनपाचे कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते.