दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेची कारवाई ः 3 देशांमधून पोहोचले होते ड्रग्ज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत 2 अफगाणी नागरिकांना अटक केली आहे. हे रॅकेट नार्को टेररिजमशी संबंधित असून अमली पदार्थांची विक्री करत मिळालेल्या पैशांचा वापर भारतविरोधी दहशतवादी कारवायांसाठी करणार होते असे सांगण्यात आले आहे.
दोन्ही अफगाणी नागरिकांनी चौकशीत दिलेल्या कबुलीनंतर 312.5 किलोग्रॅम मॅथाफेटामाइन आणि 10 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. या अमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 1200 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती दिल्ली पोलीस विभागातील अधिकारी एच.जी.एस. धालीवाल यांनी दिली आहे.
दोन्ही अफगाणी नागरिक भारतात शरणार्थी म्हणून राहत होते तसेच त्यांनी स्वतःच्या व्हिसाची मुदत दोनवेळा वाढवून घेतली होती. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक या दोघांवरही नजर ठेवून होते. याचदरम्यान मिळालेल्या एका माहितीच्या आधारावर पोलिसांनी एका कारला रोखून अफगाणी नागरिक मुस्तफा तसेच रहीम उल्लाह यांना अटक केली आहे. या दोघांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार लखनौ अन् नोएडा येथून मॅथाफेटामाईन अन् हेरॉइन जप्त करण्यात आले आहे.
मॅथाफेटामाइन हे अफगाणिस्तानातून इराण अन् मग बांगलादेशमार्गे चेन्नईच्या बंदरावर आणले जात होते. हे अमली पदार्थ चेन्नईतून प्रथम लखनौ आणि मग दिल्लीत आणल्यावर हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानात पुरविले जात होते.