पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत दीडशेहून अधिक क्रीडा संकुले उभारण्यात आली आहेत. राज्यातील ग्रामीण भागात आणखी १२२ संकुलांची नव्याने उभारण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.
श्री शिवछत्रपती क्रीडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे क्रीडा व युवक मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे क्रीडा व युवक खात्याचे सचिव रणजीत सिंह देओल, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, क्रीडायुक्त डॉ. सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर हे या वेळी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय हे टप्पे अतिशय महत्त्वाचे असतात आणि या प्रत्येक टप्प्यावर यश मिळवण्यासाठी खेळाडूंच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि मेहनत याची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जागतिक स्तरावर नेमबाजी सुवर्णपदक मिळवणाऱ्या रुद्राक्ष पाटील याला राज्य शासनाने दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित केले होते. इतर खेळाडूंनी त्याचे अनुकरण करावे. राज्यातील प्रत्येक खेळाडूची सविस्तर माहिती गोळा केली जात असून त्यामुळे खेळाडूची वेळोवेळी प्रगती कशी होत आहे याची माहिती शासनाला त्वरित मिळेल आणि त्याप्रमाणे शासनाकडून त्याला योग्य ती मदत करणे सोपे जाईल.
अधिक वाचा : …त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच
फडणवीस म्हणाले, नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा अभिमान वाढविला आहे आणि देशातील नागरिकांना देशभक्तीची काय ताकद असते याची जाणीव करून दिली आहे. त्याचा वारसदार होण्यासाठी महाराष्ट्रातील खेळाडूंनी प्रयत्न करावेत. आपल्या राज्यातील खेळाडूंना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी परदेशी प्रशिक्षकांची आवश्यकता असेल तर त्यासाठी शासनातर्फे सर्व मदत केली जाईल. गेल्या पाच वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा क्षेत्रात अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. क्रीडा विकासाकरिता केंद्र व राज्य शासन सतत सहकार्य करीत आहे. आता खेळाडूंनी त्याचा फायदा घेत महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर कसे उंचावले जाईल याचा ध्यास घेतला पाहिजे.