शहरातील सर्व व्यावसायिकांची तपासणी
वार्ताहर/ कराड
कराड शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी येत्या सात दिवसांत शहरातील सर्व लहान-मोठे व्यपारी व व्यावसायिकांची कोरोना तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली. शनिवारी मंडई परिसरातील 125 व्यावसायिकांची तपासणी केली असता त्यातील 4 जणांचा अहवाल बाधित आला आहे. शहरातील सर्व व्यापारी व व्यवसाईकांनी कोरोना तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी केले आहे.
कराड शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढत होत असल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नगरपालिका व नागरी आरोग्य केंद्राने ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार ‘सुपर स्प्रेड’ असलेले शहरातील सर्व लहान-मोठे व्यापारी, व्यावसायिक, हातगाडा चालक, भाजी व फळ विक्रेत्यांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर बाजारपेठेसह, मंडई व सर्व प्रकारचे उद्योग व्यवसाय सुरू झल्याने सर्वच ठिकाणी गर्दी होत आहे. बाजारपेठ, मंडईसह अन्य विविध ठिकाणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिक खरेदी-विक्रीच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. अशावेळी त्या व्यापारी किंवा व्यावसायिकांकडून अधिक वेगाने कोरानाचा प्रसार होण्याचा धोका आहे. त्यामुळे पालिकेने ही मोहीम सुरू केली आहे. येत्या सात दिवसांत शहरातील सर्व व्यापारी व व्यावसायिकांची तपासणी पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.
शनिवारी पालिकेच्या आवारात तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मंडई परिसरातील 125 व्यावसायिकांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातील 4 व्यावसायिकांचा ऍन्टीजेन अहवाल बाधित आला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने या व्यावसायिकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तसेच ते रहात असलेल्या परिसरात मायक्रो कंटेनमेंट झोन करून त्या परिसरातही सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले आहे.