महिलांच्या स्ट्रीट स्केटबोर्डिंगमध्ये लक्षवेधी यश, ब्राझिलियन रौप्यजेती रायस्सा देखील 13 वर्षांचीच
महिलांच्या स्ट्रीट स्केटबोर्डिंगमध्ये मोमिजी निशिया ही ऑलिम्पिक टायटल जिंकणारी जपानची सर्वात तरुण सुवर्णकन्या ठरली. निशिया ही अवघ्या 13 वर्षांची आहे. या इव्हेंटमधील तिन्ही पदके टिनेजर स्पर्धकांनी जिंकली, हे ठळक वैशिष्टय़ ठरले. ब्राझिलियन रौप्यजेती रायस्सा लिल ही देखील 13 वर्षांची आहे तर जपानची कांस्यजेती फ्यूना नाकायामा ही 16 वर्षांची आहे.
मोमिजी निशियाच्या सुवर्णपदकामुळे जपानसाठी हे स्केटबोर्डिंगमधील डबल गोल्डही ठरले. यापूर्वी यूतोने जपानला पुरुष गटातील सुवर्ण जिंकून दिले होते. निशियाला पहिल्या टप्प्यात काही वेळा झगडावे लागले. शिवाय, पहिल्या 2 ट्रिक्समध्ये तिच्या महत्त्वाच्या लँडिंग्ज चुकल्या. मात्र, शेवटच्या 3 लँडिंगमध्ये तिने सुधारणा करत अव्वलस्थानी झेप घेतली.
निशियाची जापनीज संघसहकारी ओरी निशिमुरा प्रारंभापासून अखेरपर्यंत झगडत राहिली आणि तिला आश्चर्यकारकरित्या शेवटच्या स्थानी समाधान मानावे लागले. या इव्हेंटच्या एक दिवस आधी तिला सराव करताना दुखापत झाली असल्याचे तिच्या वडिलांनी नंतर नमूद केले. निशिमुरा सध्या क्रमवारीत अव्वलस्थानी असून यामुळे तिच्याकडून येथे भरीव प्रदर्शनाची अपेक्षा होती.