मृतांमध्ये सात विद्यार्थ्यांचा समावेश ः 21 जखमी, बंदूकधाऱयाने स्वतःलाही संपवले
मॉस्को / वृत्तसंस्था
मध्य रशियातील एका शाळेत सोमवारी एका बंदूकधाऱयाने सात विद्यार्थ्यांसह 13 जणांची हत्या केली. गोळीबाराच्या या घटनेत इतर 21 जण जखमी झाल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. जखमींपैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. गोळीबारानंतर सशस्त्र सुरक्षारक्षकांनी हल्लेखोराला घेरताच त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. यात हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. बंदूकधारी व्यक्तीने “नाझी चिन्हे’’ असलेला काळय़ा रंगाचा टी-शर्ट घातला होता. हल्लेखोराच्या हेतूबद्दल कोणताही तपशील जारी करण्यात आलेला नाही.
रशियाच्या इझेव्हस्क शहरातील एका शाळेत सोमवारी एका बंदूकधाऱयाने गोळीबार केला. या घटनेत 13 जणांना प्राण गमवावा लागला. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश असून या सर्वांचे वय 11 वर्षांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय शाळेतील दोन शिक्षक आणि दोन सुरक्षा रक्षकांचाही मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये 14 मुले आणि 7 प्रौढ असल्याचे रशियाच्या तपास समितीने सांगितले.
उदमुर्तियाचे गव्हर्नर अलेक्झांडर ब्रेचलोव्ह यांच्या माहितीनुसार, शाळा सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच ही घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने बंदूक घेऊन शाळेत प्रवेश केला. गेटमधून जाण्याऐवजी सुरक्षाभिंत चढून शाळेच्या आवारात घुसल्यामुळे तो सुरक्षारक्षकांच्या नजरेतून निसटल्याचे सांगण्यात आले. या व्यक्तीने आत प्रवेश करताच वर्गात जाणाऱया मुलांवर गोळीबार सुरू केला. यादरम्यान शाळेत चेंगराचेंगरी झाली. गोळीबारानंतर पोलीस संरक्षणात मुलांना शाळेतून घरी पाठवण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी इझेव्हस्क शहरातील शाळेच्या भागाला वेढा घातला. हल्लेखोर एकटा नसून त्याच्यासोबत आणखी कोणीतरी असण्याचा संशय पोलिसांना आहे. परिसरातील प्रत्येक घराची झडती घेतली जात आहे. हल्लेखोर कोण होता आणि त्याचा हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
उदमुर्तिया प्रदेशातील मॉस्कोपासून 960 किलोमीटर पूर्वेला असलेल्या इझेव्हस्क शहरातील एका शाळेत गोळीबार झाला. इझेव्हस्क हे 6 लाख 40 हजार लोकसंख्या असलेले शहर असून ते मध्य रशियामधील उरल पर्वतांच्या पश्चिमेस स्थित आहे. हा परिसर औद्योगिक केंद्र म्हणून ओळखला जातो.