अमेरिकेत कौतुक, कोरोना उपचारांसाठी ठरणार उपयुक्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अनिका चेब्रोलू या भारतीय वंशाच्या 14 वर्षीय मुलीने केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे कोरोना उपचारांना मोठेच पाठबळ मिळणार आहे. अमेरिकेतील टेक्सान प्रांताच्या फ्रिस्को येथे ती आठव्या इयत्तेत शिकत असून तिने विज्ञान क्षेत्रात महत्त्वाची पारितोषिके मिळविली आहेत. तिला नुकताच ‘थ्री एम यंग सायंटिस्ट चँलेंज’ हा 25 हजार डॉलर्सचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
तिने केलेल्या संशोधनामुळे कोरोना विरोधातील लस निर्माण करण्याला मोठे साहाय्य मिळणार आहे, असे प्रतिपादन अनेक तज्ञांनी केले आहे. तिने एक ‘सिलिको’ रेणू शोधला असून तो कोरोना विषाणूला निष्प्रभ करू शकतो. या रेणूमुळे कोरोना विषाणूचे टोकेरी भाग बोथट होतात आणि हा विषाणू मानवी पेशींमध्ये घुसण्याला प्रतिबंध होऊ शकतो. परिणामी, कोरोना बरा होतो.
तिच्या संशोधनाची माहिती ‘3 एम चॅलेंज’च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. गेल्या वर्षी तिला स्वतःलाच तीव्र स्वरूपाचा फ्ल्यू झाला होता. त्यातून बरी झाल्यानंतर तिने फ्ल्यू आणि त्याचे विविध प्रकार यांच्यावर संशोधन करण्याचे कार्य एक आव्हान म्हणून सुरू केले होते. त्यात तिला यश मिळाले आहे.
ज्येष्ठांकडून कौतुक
तिच्या संशोधनाचे विषाणू शास्त्र तज्ञांनी कौतुक केले आहे. तिने कोरोना निर्मूलनाच्या या संग्रामात मोठा पल्ला या संशोधनामुळे गाठला आहे, असे तिच्या शिक्षकांनी आणि मार्गदर्शकांनी सांगितले. ती शोधक प्रवृत्तीची असून समस्येच्या मुळापर्यंत जाऊन अभ्यास करण्यावर तिचा भर असतो, असे सांगण्यात आले.
थोडक्या वेळात संशोधन
एक वर्षाच्या अल्प कालावधीत तिने हे महत्त्वाचे संशोधन केले आहे. कोरोना विषाणूने आपले स्वरूप बदलले तरी तिने शोधलेला रेणू कोरोनाला जखडून ठेवू शकतो, हे या संशोधनाचे वैशिष्टय़ मानले जात आहे. आता या पायाभूत संशोधनावर आणखी प्रयोग व अभ्यास झाल्यानंतर प्रत्यक्ष औषध किंवा लस निर्मितीत त्याचा उपयोग केला जाईल, असे तिच्या सहकाऱयांनी म्हटले आहे.
कार्यपूर्ती अद्याप नाही
आपल्याला मोठा पुरस्कार मिळाला असला आणि आपली प्रसिद्धी झाली असली तरी आपण समाधानी नाही. अद्याप आपले संशोधन पूर्णत्वास पोहचलेले नाही. जगात असंख्य संशोधक आज कोरोनावर औषध किंवा लस शोधण्यासाठी अथक प्रयास करीत आहेत. त्यांना साहाय्य व्हावे आणि संशोधनाची गती वाढावी यासाठी माझे प्रयत्न आहेत. कोरोनावर प्रभावी उपचार शोधल्यानंतरच आपले संशोधन पूर्णत्वास जाईल, असे तिने विनयशीलपणे स्पष्ट केले.
अतुलनीय कामगिरी
ड कोरोनावर मात करू शकेल असे संशोधन करण्यात यश
ड अल्पावधीत मिळविलेल्या यशामुळे साऱया जगभरात प्रशंसा
ड कोरोनावर औषध किंवा लस शोधण्यासाठी उपयुक्त पाया