दिवसभरात 64,399 नवे बाधित : 861 जणांचा कोरोनाने मृत्यू : वाढत्या संसर्गामुळे चिंतेचे वातावरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात सध्या कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. या महामारीतच एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता 68.78 टक्क्यांवर पोहोचले आहे. रविवारपर्यंत देशात 14 लाख 80 हजार 884 जण कोरोनातून उपचार घेऊन घरी परतले आहेत. कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून देशाचा रिकव्हरी रेट सुद्धा वाढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, रिकव्हरी रेट वाढला असला तरी बाधितांच्या एका दिवसातील आकडय़ानेही 65 हजारांसमीप झेप घेतल्याने चिंतेचे वातावरण कायम आहे.
सध्या 6 लाख 28 हजार 747 रुग्णांवर उपचार (सक्रिय रुग्ण) सुरु आहेत. कोरोनामुळे होणाऱया रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात यश आले असून त्याची टक्केवारी 2.01 इतकी झाली आहे. देशात रविवारी तब्बल 64 हजार 399 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यामुळे देशातील कोरोना संसर्गित रुग्णांचा आकडा वाढून 21 लाख 53 हजार 010 झाला आहे. तर मृतांचा आकडा 861 ने वाढल्याने 43 हजार 379 वर पोहोचला आहे. दिवसभरातील 861 मृतांमध्ये महाराष्ट्रातील 275, तामिळनाडूतील 118, आंध्रप्रदेशमध्ये 97 आणि कर्नाटकातील 93 जणांचा समावेश आहे.
रिकव्हरी रेट 68.78 टक्क्मयांवर
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 53 हजार 879 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशाचा 15 जूनपर्यंत रिकव्हरी रेट 51.08 होता. तो आता वाढून 68.78 टक्क्मयांवर गेला आहे.
दिवसभरात 7.19 लाख चाचण्या…
कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे आरोग्य तपासण्यांचा वेगही वाढविण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या काही दिवसात नव्या प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्याने चाचण्यांची गती वाढली आहे. रविवारपर्यंत अखेरच्या चोवीस तासात तब्बल 7 लाख 19 हजार 364 तपासण्या करण्यात आल्याची माहिती ‘आयसीएमआर’कडून देण्यात आली. तसेच देशात आतापर्यंत 2 कोटी 41 लाख 6 हजार 535 चाचण्या पूर्ण केल्याचेही नमूद करण्यात आले.
अमित शहांच्या चाचणीसंबंधी ‘टिवटिवाट’
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना विषाणू चाचणी निगेटिव्ह आल्याबाबतचे ट्विट भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी केले होते. मात्र, काही वेळातच त्यांनी सदर पोस्ट डीलीट केल्यामुळे सोशल मीडियावर दिवसभर ‘टिवटिवाट’ सुरू होता. अखेर यासंबंधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच खुलासा करत शहा यांची दुसरी चाचणी झालेली नसून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची स्पष्टोक्ती दिली. काही दिवसांपुर्वी अमित शहा यांनी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते. डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार शहा रुग्णालयात दाखल झाले होते.