गुजरात-मोरबी येथील दुर्घटना ः केबल तुटल्याने शेकडो लोक कोसळले नदीत
मोरबी / वृत्तसंस्था
गुजरातमधील मोरबी येथे रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास केबलचा झुलता पूल कोसळल्याने सुमारे 400 लोक मच्छू नदीत कोसळले. या दुर्घटनेत सुमा रे 140 हून अधिक जण मृत्युमुखी पडले. तसेच दीडशेहून अधिक जणांना रुग्णालयात दाखल केल्याचीही माहिती देण्यात आली. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने शेकडो पर्यटकांनी पुलावर गर्दी केल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्याबरोबरच जखमींना योग्य उपचार करण्याच्या सूचना वैद्यकीय यंत्रणांना दिल्या आहेत.
रविवारी सायंकाळी काळोख पडण्याच्या वेळेस घडलेल्या या दुर्घटनेमुळे मदत व बचावकार्यात अडचणी येत होत्या. तरीही अग्निशमन दल आणि एनडीआरएफने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. 50 हून अधिक लोकांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात हलवले. जखमी व मृतांच्या आकडय़ांबाबत नेमकी माहिती जारी करण्यात आली नसली तरी 140 हून अधिक मृत्युमुखी पडल्याचा दावा मोरबी येथील भाजपचे माजी आमदार कांती अमृतिया यांनी केला आहे. मृतांमध्ये 10 हून अधिक मुलांचा समावेश आहे. दरम्यान, सध्या गुजरात दौऱयावरच असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी या दुर्घटनेचा आढावा घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल स्वतः मोरबीमध्ये दाखल झाले आहेत. या दुर्घटनेच्या एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
नुतनीकरणानंतर पाच दिवसांपूर्वीच पूल सेवेत
दुर्घटना घडलेला झुलता पूल गेल्या 6 महिन्यांपासून बंद होता. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून नुकतेच त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. दिवाळीच्या एका दिवसानंतर म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर चारच दिवसांनी पूल तुटून दुर्घटना घडल्याने हाहाकार निर्माण झाला आहे.
एनडीआरएफ, एसडीआरएफ मदतकार्यात
मोरबीमध्ये घडलेल्या या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ जवानांची पथके बचावकार्यात गुंतली आहेत. याशिवाय कच्छ आणि राजकोट येथून जलतरणपटू आणि अग्निशमन दलाची 7 पथके रवाना होत रात्री उशिरा मदतकार्यात सहभागी झाली. नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने 02822243300 हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे.
पूल 140 वर्षांहून अधिक जुना
मोरबीचा हा झुलता पूल 140 वर्षांहून जुना असून त्याची लांबी सुमारे 765 फूट आहे. हा झुलता पूल केवळ गुजरातच्या मोरबीचाच नाही तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा आहे. 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. ते 1880 मध्ये त्यावेळी सुमारे 3.5 लाख खर्चून पूर्ण झाले. त्यावेळी हा पूल बनवण्याचे सर्व साहित्य इंग्लंडमधूनच आयात करण्यात आले होते. तेव्हापासून या पुलाचे अनेकवेळा नूतनीकरण करण्यात आले. नुकतेच दिवाळीपूर्वी दोन कोटी रुपये खर्चून त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले.
पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडून घटनेची माहिती घेतली आणि मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. अमित शाह यांनी गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्याशी चर्चा केल्यानंतर तत्काळ उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आप, काँग्रेसकडून भाजपवर टीकास्त्र
या अपघातावरून काँग्रेसने भाजप सरकारला धारेवर धरले आहे. निवडणुकीच्या घाईत भाजपने हा पूल जनतेसाठी लवकर खुला केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या घटनेला दुःखी म्हटले आहे.
क्षमता 100 लोकांची , गर्दी 400 जणांची
हा पूल महापालिकेच्या मालकीचा असल्याचे रस्ते व इमारत विभागाचे मंत्री जगदीश पांचाळ यांनी दुर्घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच पुलाची क्षमता सुमारे 100 लोकांचे वजन उचलण्याची आहे. मात्र, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अपघाताच्या वेळी पुलावर 400 ते 500 लोक जमा झाले होते. एकंदर एखाद्या व्यक्तीचे सरासरी वजन 60 किलो गृहीत धरले तरी पुलावरील भार 30 टनांपेक्षा जास्त झाल्यामुळे पूल मधून तुटल्याचे सांगण्यात आले.
ओरेवा ग्रुपकडे देखभालीचे काम
दुर्घटनाग्रस्त पुलाच्या देखभालीची जबाबदारी ओरेवा ग्रुपकडे आहे. या गटाने मार्च 2022 ते मार्च 2037 पर्यंत 15 वर्षांसाठी मोरबी नगरपालिकेसोबत करार केला आहे. हा गट पुलाची सुरक्षा, स्वच्छता, देखभाल, शुल्कवसुली, कर्मचारी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतो. या पुलावरून राजा प्रजावत्सल्य राजवाडय़ातून राजदरबारात जात असे. राजेशाही संपल्यानंतर या पुलाची जबाबदारी मोरबी नगरपालिकेकडे सोपवण्यात आली. लाकूड आणि तारांनी बनलेला हा पूल 233 मीटर लांब आणि 4.6 फूट रुंद आहे.