मिझोरम पोलिसांची कारवाई : 34 कोटीचे हेरॉइन जप्त
वृत्तसंस्था /ऐझोल
मिझोरममध्ये पशूतस्करीचे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी तस्करांकडून 140 प्राणी आणि पक्ष्यांना वाचविले आहे. यात 30 कासवं, 22 अजगर आणि 55 मगरींचा समावेश आहे. याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. विदेशी प्राण्यांना म्यानमारमधून आणले गेले होते आणि यात दोन देशांचे तस्कर सामील होते असे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे मिझोरम पोलिसांनी चंफाई येथून 34 कोटींचे हेरॉइन जप्त केले आहे.
मिझोरममधील चंफाई पोलीस, अबकारी पथक आणि नार्कोटिक्स विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. पथकाने तपासणीदरम्यान 2 बोलेरो आणि एका स्कॉर्पिओ वाहनाला रोखले होते. या वाहनांमध्ये अनेक प्राणी पिंजऱयात कैद आढळून आले. या प्राण्यांना ताब्यात घेतल्यावर चौकशीतून हे म्यानमारमधून आणले गेल्याचे स्पष्ट झाले. या प्राण्यांना संबंधित विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सप्टेंबर महिन्यात आसाममध्ये 40 विदेशी प्राण्याना वाचविण्यात आले होते. या प्राण्यांची तस्करी देखील म्यानमारमधून करण्यात आली होती. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली होती. तत्पूर्वी मुंबईत 8 ऑक्टोबर रोजी डीआरआयने 665 विदेशी प्राण्यांची सुटका केली होती. यात अजगर, पाल, कासाव आणि इगुआना माशाचा समावेश होता. याप्रकरणी दोन तस्करांना जेरबंद करण्यात आले होते.